इसिसचा म्होरक्‍या बगदादी रशियाच्या हल्ल्यात ठार?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

सीरियामध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सीरियात इसिसविरोधात लढणाऱ्या गटाने अद्याप बगदादी ठार झाल्याच्या वृत्तास पुष्टी दिलेली नाही. मात्र या हल्ल्यांबाबात अमेरिकेस आगाऊ कल्पना देण्यात आली होती, असे रशियाने स्पष्ट केले आहे

मॉस्को - सीरियामधील राक्का या शहरानजीक करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या अबु बकर अल बगदादी हा ठार झाल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला आहे. इसिसचे म्होरक्‍ये या भागामध्ये चर्चेसाठी एकत्र येणार असल्याची संवेदनशील माहिती मिळाल्यानंतर रशियाने येथे हवाई हल्ले केले होते.

"रशियन हवाई दलाकडून या भागामध्ये हवाई हल्ला घडविण्यात आल्यावेळी बगदादी हा तेथे उपस्थित होता. या हल्ल्यांमुळे बगदादी हा ठार झाला आहे,'' असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. इसिसचे इतर वरिष्ठ म्होरक्‍येही या हल्ल्यात ठार झाल्याचे मानले जात आहे. सीरियामध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सीरियात इसिसविरोधात लढणाऱ्या गटाने अद्याप बगदादी ठार झाल्याच्या वृत्तास पुष्टी दिलेली नाही. मात्र या हल्ल्यांबाबात अमेरिकेस आगाऊ कल्पना देण्यात आली होती, असे रशियाने स्पष्ट केले आहे.

सीरिया व इराकमधील भागांमध्ये इसिस सध्या पराभवाच्या उंबरठ्यावर असल्याचे मानले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर हे वृत्त अत्यंत संवेदनशील मानले जात आहे.