ब्रिटनमधील आण्विक प्रकल्प, विमानतळ धोक्‍यात

वृत्तसंस्था
रविवार, 2 एप्रिल 2017

इस्लामिक स्टेट (इसिस) वा अन्य दहशतवादी संघटनांना स्फोट घडविण्यासाठी लॅपटॉप वा मोबाईल फोन्सचा वापर करणारे तंत्रज्ञान हस्तगत करण्यात यश आल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामध्ये विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था भेदण्याचीही क्षमता आहे

लंडन - ब्रिटनमधील आण्विक प्रकल्प आणि विमानतळांवर दहशतवादी हल्ला घडविण्याच्या व्यक्त करण्यात आलेल्या भीतीनंतर येथील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. येथील आण्विक प्रकल्प व विमानतळांच्या सॉफ्टवेअर प्रणाली हॅक करण्यात आल्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली आहे. या पार्श्‍वभूमीवर अशा संवेदनशील प्रकल्पांची एकंदर सुरक्षा व्यवस्था भेदण्यात दहशतवाद्यांना यश आल्याची भीती येथील सुरक्षा दलाने व्यक्त केली आहे.

इस्लामिक स्टेट (इसिस) वा अन्य दहशतवादी संघटनांना स्फोट घडविण्यासाठी लॅपटॉप वा मोबाईल फोन्सचा वापर करणारे तंत्रज्ञान हस्तगत करण्यात यश आल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामध्ये विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था भेदण्याचीही क्षमता आहे.

गुप्तचर खात्याच्या या भीतीमुळेच नुकताच अमेरिका व ब्रिटन या देशांनी विमानप्रवास करताना लॅपटॉप वा अन्य इलेक्‍ट्रॉनिक यंत्रे बाळगण्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर, ब्रिटनमधील आण्विक प्रकल्पांच्या सुरक्षेसही हॅकिंगचा मोठा धोका आहे. ब्रिटनमध्ये सद्यस्थितीत 15 अणुभट्ट्या असून त्यांचा देशातील वीजनिर्मितीमधील वाटा एक पंचमांश इतका आहे.

या पार्श्‍वभूमीवर, सरकारने या धोक्‍यासंदर्भात "त्वरित उपाययोजना' करणे आवश्‍यक असल्याचा इशारा ब्रिटनमधील "रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट' या प्रभावशाली थिंक टॅंककडून देण्यात आला आहे.

Web Title: Britain's nuclear stations, airports on terror alert