चिनी कंपन्यांवर निर्बंधांचा अमेरिकेचा विचार

पीटीआय
शुक्रवार, 7 जुलै 2017

वॉशिंग्टन - युद्धखोर उत्तर कोरियावर चीनकडून कारवाई होण्याची आशा फोल ठरत असल्याने अमेरिकेने चीनवरील कंपन्यांवरच आर्थिक निर्बंध घालण्याच्या पर्यायावर विचार करणे सुरू केले आहे. या कंपन्यांवर निर्बंध घातल्यास उत्तर कोरियाच्याही अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

इराणवर आर्थिक निर्बंध टाकल्यामुळेच ते चर्चेस तयार झाले होते, हा अनुभव लक्षात घेऊन हाच मार्ग चीन आणि दक्षिण कोरियाच्या बाबतीत अवलंबण्याचा अमेरिकेचा विचार आहे. मात्र, यामुळे चीनबरोबरील तणावात वाढ होऊन इतर प्रकरणांमध्येही वाद वाढण्याचा धोका आहे. अमेरिकेपर्यंत पोचू शकणाऱ्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी उत्तर कोरियाने घेतल्यापासून अमेरिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमेरिकेने थेट लष्करी बळाचा वापर केल्यास दक्षिण कोरियातील लाखो निरपराध नागरिकांचा जीव धोक्‍यात येऊ शकतो, असा इशाराही तज्ज्ञांनी अमेरिकेला दिला आहे. पोलंडच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही कडक कारवाई करण्याचे सूतोवाच केले आहे.

सध्या उत्तर कोरियाला लक्ष्य करत अमेरिकेने आपल्या देशातील अनेक कंपन्या आणि व्यक्तींवर निर्बंध आणले आहेत. आता इतर देशांमधील कंपन्यांवरही बंदी घालत उत्तर कोरियाचा व्यापार थांबविण्याकडे अमेरिका पावले उचलण्याची शक्‍यता आहे. उत्तर कोरियाचा 90 टक्के व्यापार चीनबरोबर होत असल्याने चिनी कंपन्याच अमेरिकेच्या "हिटलिस्ट'वर असतील, असा अंदाज आहे. कोरियाशी व्यापार थांबवा, अन्यथा अमेरिकेतून बाहेर पडा, असा इशाराच या कंपन्यांना दिला जाऊ शकतो. गेल्या आठवड्यातही उत्तर कोरियामध्ये पैसे गुंतविल्याबद्दल अमेरिकेने एका चिनी बॅंकेवर निर्बंध घातले होते.