चीनचा संरक्षण खर्च भारताच्या तीनपट

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मार्च 2017

चीनने संरक्षण खर्चात वाढ केल्यामुळे इतर कुठल्याही देशांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण खर्चात तब्बल दहा टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यातुलनेत चीनचा संरक्षणावरील खर्च कमीच आहे.
- फू यिंग, "एनसीपी'च्या प्रवक्‍त्या

बीजिंग - भारताशी सीमाप्रश्‍नांवरून सुरू असलेले वाद आणि दक्षिण चिनी समुद्रातील वादग्रस्त बेटांच्या मालकी हक्कावरून अमेरिकेसह इतर अनेक देशांशी असलेल्या संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला असताना चीनच्या संरक्षण खर्चाचे आकडे आकाशाला भिडताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक देशांच्या चिंतेत भर पडली आहे. सात टक्‍क्‍यांची वाढ करण्यात आल्यामुळे चीनचा संरक्षण क्षेत्राचा अर्थसंकल्प तब्बल 152 अब्ज डॉलरवर पोचला आहे. विशेष म्हणजे चीनचा संरक्षण खर्च आता भारताच्या तीनपट झाला आहे. संरक्षण खर्चात मोठी वाढ करून चीनने एकप्रकारे अमेरिकेला शह देण्याचा प्रयत्न केला असल्याचे जाणकारांचे मत आहे.

2016च्या तुलनेत चीनच्या संरक्षण खर्चात सात टक्‍क्‍यांची वाढ करण्यात आली असून, ते आता 1.04 ट्रिलियन युआन (म्हणजेच 152 अब्ज डॉलर) वर पोचला असल्याचे आज अधिकृतरीत्या सांगण्यात आले. पंतप्रधान ली केकियांग यांनी रविवारी सादर केलेल्या अहवालात संरक्षण खर्चाबाबतची आकडेवारी स्पष्ट करण्यात आली नव्हती. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती आज जाहीर केली. संरक्षणावरील एकूण खर्चापैकी 1.02 ट्रिलियन युआन हे केंद्रीय अर्थसंकल्पातून देण्यात येणार असल्याचेही वृत्तात म्हटले आहे. चीनच्या संरक्षण खर्चाच्या आकडेवारीने प्रथमच ट्रिलियन युआनचा टप्पा पार केला आहे. चीनच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील (जीडीपी) 1.3 टक्के भाग हा संरक्षणावर खर्च केला जाणार आहे.

चीनच्या पंतप्रधानांनी रविवारी नॅशनल पीपल्स कॉंग्रेससमोर (एनपीसी) सादर केलेल्या आपल्या वार्षिक अहवालात संरक्षण खर्चाच्या आकडेवारीचा उल्लेख का केला नाही, याबाबत अधिकृतरीत्या कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

अलीकडील काळात सीमावाद वाढल्याने चीनने नौदलाच्या क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून, अर्थसंकल्पातील मोठा भाग नौदलासाठी वापरला जाणार आहे.

चीनने संरक्षण खर्चात वाढ केल्यामुळे इतर कुठल्याही देशांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण खर्चात तब्बल दहा टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यातुलनेत चीनचा संरक्षणावरील खर्च कमीच आहे.
- फू यिंग, "एनसीपी'च्या प्रवक्‍त्या

आकडेवारी
152 अब्ज डॉलर ः चीनचा एकूण संरक्षण खर्च
53.5 अब्ज डॉलर ः भारताचा एकूण संरक्षण खर्च
654 अब्ज डॉलर ः अमेरिकेचा प्रस्तावित एकूण संरक्षण खर्च