कम्युनिस्ट चीनकडून व्हॉट्‌सऍपवर नवीन, जाचक निर्बंध

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

चीनने या वर्षी डिजिटल माध्यमांवरील माहितीचे नियंत्रण अधिक कडक केले आहे. याशिवाय या नव्या धोरणांतर्गत चीनने विविध क्षेत्रांतील कंपन्यांना त्यांची संवेदनशील माहिती देशामध्येच साठविणे बंधनकारक केले आहे. देशात फेसबुक, ट्विटर आणि इतर परदेशी माध्यम संकेतस्थळांवर गेल्या अनेक वर्षांपासून बंदी घालण्यात आली आहे

बीजिंग - चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढील महिन्यात होणाऱ्या संवेदनशील बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर येथील प्रशासनाने "राजकीय सेन्सॉरशिप'चे धोरण अधिक कडक करत व्हॉट्‌सऍपवर जाचक निर्बंध लादले आहेत. यामुळे देशभरात विविध भागांत व्हॉट्‌सऍप सातत्याने बंद पडण्याच्या घटना घडत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

चीनने या वर्षी डिजिटल माध्यमांवरील माहितीचे नियंत्रण अधिक कडक केले आहे. याशिवाय या नव्या धोरणांतर्गत चीनने विविध क्षेत्रांतील कंपन्यांना त्यांची संवेदनशील माहिती देशामध्येच साठविणे बंधनकारक केले आहे. देशात फेसबुक, ट्विटर आणि इतर परदेशी माध्यम संकेतस्थळांवर गेल्या अनेक वर्षांपासून बंदी घालण्यात आली आहे. याच पार्श्‍वभूमीवर, व्हॉट्‌सऍपवरही नवीन निर्बंध लादण्यात आले आहेत.

येत्या 18 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीमध्ये सध्याचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना आणखी पाच वर्षांची मुदतवाढ दिली जाण्याची शक्‍यता आहे. यामुळे चीनने माहितीवरील निर्बंध आणखी कडक केले आहेत.