चीनने पुन्हा आळवला मैत्रीचा सूर; आता सहकार्यावर भर

वृत्तसंस्था
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

दोन शेजारी महासत्तांमध्ये मतभेद असणे ही काही फार मोठी गोष्ट नाही; पण अशा स्थितीमध्येही आम्ही योग्य व्यासपीठावर, योग्यवेळी समस्या मांडल्या आहेत. परस्परांचा आदर करत आम्ही यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना उभय देशांच्या नेत्यांमध्ये मतैक्‍यही झाले असे वांग यांनी म्हटले आहे

बीजिंग -  डोकलाममधील निवळलेला तणाव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आगामी दौरा लक्षात घेऊन चिनी परराष्ट्रमंत्र्यांनी मैत्रीचे सूर आळवायला सुरवात केली आहे. आशियातील महासत्ता असणाऱ्या चीन आणि भारताला मैत्री, सहकार्यासाठी मोठी संधी असल्याचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी आज नमूद केले.

दोन शेजारी महासत्तांमध्ये मतभेद असणे ही काही फार मोठी गोष्ट नाही; पण अशा स्थितीमध्येही आम्ही योग्य व्यासपीठावर, योग्यवेळी समस्या मांडल्या आहेत. परस्परांचा आदर करत आम्ही यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना उभय देशांच्या नेत्यांमध्ये मतैक्‍यही झाले असे वांग यांनी म्हटले आहे. मध्यंतरी डोकलाममधील चिनी घुसखोरीस भारताने विरोध करत तेथे आपले सैन्यही तैनात केले होते. यामुळे दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला होता. चीनने आक्रमक भूमिका घेतल्याने आंतरराष्ट्रीय सीमेवर युद्धाचे ढग जमू लागले होते. अखेरीस चीननेच डोकलाममधून माघार घेतल्याने येथील तणाव निवळला आहे.

कोणाचाच विजय नाही
ब्रिक्‍स देशांच्या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी होणार असून, येथे ते चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. या निमित्ताने भारत आणि चीनमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये निर्माण झालेला तणाव निवळू शकतो. डोकलाममधील तणाव संपुष्टात आला असला तरीसुद्धा कोणताच देश स्पष्ट विजयाचा दावा करू शकत नाही, असे भारताच्या माजी परराष्ट्र सचिव निरूपमा राव यांनी सांगितले.

म्हणून तणाव संपला
याआधी अस्तानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या अध्यक्षांची भेट घेतली होती. येथे दोन्ही नेत्यांनी मतभेदाचे रूपांतर वादांमध्ये होता कामा नये यावर भर दिला होता. डोकलामचा वादही त्याच धर्तीवर सोडविण्यात आला असावा, अशी शक्‍यता आहे. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना भारताने आश्रय दिल्यानेही चीनचे पित्त खवळले होते.

स्पष्ट भूमिका नाही
सुरवातीस भारताला धमक्‍या देणाऱ्या चीनने डोकलाममधील रस्त्यांचे बांधकाम थांबविले असून येथील सामग्रीही हलविण्यात आली आहे. याची माहिती भारत सरकारला कळविण्यात आली असल्याचे चीनकडून सांगण्यात आले. पण पुन्हा येथील बांधकाम सुरू करायचे की नाही याबाबत स्पष्ट माहिती देणे मात्र चीनने टाळले आहे.

Web Title: china india doklam