डोकलामवरचा दावा सोडलेला नाही - भूतान

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

डोकलामबाबत आमची भूमिका ठाम असून चीनने या भागात रस्ता बांधणे हा दोन देशांमधील कराराचा भंग असल्याचे भूतानने पूर्वीच स्पष्ट केले आहे. भूतान आणि चीन दरम्यान सीमा निश्‍चित करण्याबाबत चर्चा सुरु असून यासाठी 1988 आणि 1998 मध्ये करारही झाले आहेत

थिम्फू - डोकलाम हा आमचा भाग नसल्याचे भूतानने सांगितल्याचा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा दावा भूतान सरकारने फेटाळून लावला आहे. या भागावर भूतानचा दावा असल्याचे येथील सरकारने स्पष्ट केले आहे.

डोकलाम भूतानचा भाग असल्याचे भूतान सरकारने राजनैतिक मार्गाने कळविले असल्याचा दावा चीनच्या वरीष्ठ राजनैतिक अधिकारी वॅंग वेन्ली यांनी केला होता. वेन्ली यांनी भारतीय माध्यमांना ही माहिती सांगितली होती. मात्र, हे सांगताना त्यांनी कोणताही पुरावा दिला नव्हता. भूतानने मात्र आज वेन्ली यांचा दावा साफ फेटाळून लावला. डोकलामबाबत आमची भूमिका ठाम असून चीनने या भागात रस्ता बांधणे हा दोन देशांमधील कराराचा भंग असल्याचे भूतानने पूर्वीच स्पष्ट केले आहे. भूतान आणि चीन दरम्यान सीमा निश्‍चित करण्याबाबत चर्चा सुरु असून यासाठी 1988 आणि 1998 मध्ये करारही झाले आहेत. या करारानुसार, सीमा निश्‍चित होईपर्यंत या भागात शांतता कायम राखण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध आहेत. मात्र, तरीही चीनने डोकलाममध्ये रस्ता बांधण्याचा प्रयत्न करत कराराचा भंग केल्याचा आरोप भूतानने केला आहे. भारतीय सैन्य चीनच्या भूमीत गेल्याचे आश्‍चर्य भूतानने व्यक्त केल्याचा चीनचा दावाही भूतान सरकारने फेटाळून लावला.

तणावास चीन कारणीभूत
वॉशिंग्टन : डोकलाममध्ये चीनच्या चिथावणीखोर भूमिकेमुळे तणाव वाढत असल्याचा दावा अमेरिकेचे भारतीय वंशाचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी केला आहे. कृष्णमूर्ती यांनी नुकताच भारत दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. हा वाद चर्चेच्या मार्गातूनच सोडविण्याचे आणि कोणतीही आक्रमक कृती न करण्याचे आवाहन भारताला केल्याचे त्यांनी सांगितले.