राष्ट्रसंघातील मसूद अझहरसंदर्भातील प्रस्ताव चीनने पुन्हा रोखला 

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात चीनने तांत्रिक कारण देत हा प्रस्ताव सहा महिन्यांसाठी रोखून धरला होता. 2 ऑगस्ट रोजी त्याची मुदत संपल्याने याविषयी निर्णय होईल, अशी शक्‍यता व्यक्त होत होती. मात्र, चीनने पुन्हा आपले दात दाखवले

न्यूयॉर्क - जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या संयुक्त राष्ट्रसंघातील (यूएन) प्रस्तावाला चीनने पुन्हा विरोध दर्शवला. चीनच्या या अडकाठीमुळे याबाबतचा निर्णय आणखी तीन महिने रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात चीनने तांत्रिक कारण देत हा प्रस्ताव सहा महिन्यांसाठी रोखून धरला होता. 2 ऑगस्ट रोजी त्याची मुदत संपल्याने याविषयी निर्णय होईल, अशी शक्‍यता व्यक्त होत होती. मात्र, चीनने पुन्हा आपले दात दाखवले. यामुळे हा प्रस्ताव आता 2 नोव्हेंबरपर्यंत "जैसे थे'च राहणार आहे.

दरम्यान, याबाबतची मुदत संपल्यानंतर चीनने पुन्हा बाधा उत्पन्न केली नसती, तर यूएनने मसूदला औपचारिकरीत्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले असते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्रस्तावाबाबत योग्यवेळी निर्णय घेणार असल्याचे चीनने म्हटले आहे.

Web Title: china masood azhar united nations