चीन-पाकिस्तान "सीपीईसी'बरोबरच दहशतवादाविरोधात सहकार्य वाढवणार

वृत्तसंस्था
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

चीनबरोबर मैत्रीपूर्ण संबंध हे पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणातील आधारस्तंभ आहे.
- ख्वाजा असिफ, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री

बीजिंग - चीन आणि पाकिस्तान आता दोन्ही देशांतील हिंसाचारग्रस्त भागांना जोडण्यासाठी रस्ते आणि रेल्वे मार्गावर भर देणार आहेत. यासाठी 50 अब्ज डॉलर खर्च करणार असून त्याचबरोबर दहशतवादविरोधात लढाईत सहकार्य वाढण्यावरही उभय देशांचे एकमत झाले आहे.

चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्र (सीपीइसी) हे पश्‍चिम चीनमधील शिनजियांग प्रांत आणि दक्षिण पश्‍चिम पाकिस्तानातील अरबी समुद्रातील ग्वादर बंदराशी जोडले आहे. या दोन्ही क्षेत्रावर सध्या दहशतवाद्यांचे सावट आहे. त्यामुळे या भागात सुरक्षेबाबत दोन्ही देशांनी सहकार्य वाढण्याचा निर्णय घेतला आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनिपिंग यांचा बेल्ट अँड रोड (बीअँडआर) योजनेतील पहिला भाग असणारे सीपीईसी क्षेत्र पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमधून गेले आहे. त्यामुळे भारताने या प्रकल्पाला आक्षेप घेतला आहे. दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासीर खान जांजुआ हे सध्या चीन दौऱ्यावर असून कम्युनिस्ट पक्षाच्या सेंट्रल कमिटीचे मेंग जियांझू यांनी या दोन्ही नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची भेट घेऊन संरक्षण सहकार्यबाबत करारावर स्वाक्षऱ्या केल्या. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने सीपीईसीशी निगडीत असलेल्या विविध योजनांवर काम करत असलेल्या चीनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी 15 हजार सैनिक तैनात केले आहे. गेल्यावर्षी कामानिमित्त किमान 71 हजार चीनी नागरिक पाकिस्तानला गेल्याचे सांगितले जाते. मेंग यांनी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधातील प्रयत्नांचे कौतुक केले आणि महत्त्वकांक्षी सीपीइसी प्रकल्पाच्या माध्यमातून परस्पर सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले.

चीनबरोबर मैत्रीपूर्ण संबंध हे पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणातील आधारस्तंभ आहे.
- ख्वाजा असिफ, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री