भारताबरोबरील तणाव: चीनचा तिबेटमध्ये युद्धसराव

वृत्तसंस्था
सोमवार, 17 जुलै 2017

या युद्धसरावाचे चित्रीकरणही प्रसिद्ध करण्यात आले असून यामध्ये चिनी सैनिक बंकर्स व तोफांमधून होणाऱ्या हल्ल्यांविरोधात टॅंकविरोधी ग्रेनेड्‌स व क्षेपणास्त्रे वापरत असताना दिसून येत आहेत

बीजिंग - सिक्कीम सेक्‍टरमधील डोकलाम भागामध्ये भारतीय लष्कर व चिनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर चीनकडून तिबेटमध्ये युद्धसराव करण्यात आला. "पीपल्स लिबरेशन आर्मी' (पीएलए) या चिनी सैन्याकडून नैऋत्य तिबेटमध्ये युद्धसराव करण्यात आल्याचे वृत्त चीनमधील सरकारी वाहिनीच्या माध्यमामधून देण्यात आले.

पीएलएच्या "तिबेट लष्करी मुख्यालयामधील' सैन्य तुकडीने या युद्धसरावामध्ये सहभाग घेतला असून ही डोंगराळ भागात लढण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलेल्या तुकड्यांपैकी (माऊंटन ब्रिगेड) एक असल्याचे ग्लोबल टाईम्स या चीनमधील सरकारी मालकीच्या वृत्तपत्राने म्हटले आहे. भारत चीन प्रत्यक्ष ताबारेषेवरील भाग व तिबेटमधील अन्य काही ठिकाणी ही तुकडी तैनात करण्यात आली आहे.

या युद्धसरावाचे चित्रीकरणही प्रसिद्ध करण्यात आले असून यामध्ये चिनी सैनिक बंकर्स व तोफांमधून होणाऱ्या हल्ल्यांविरोधात टॅंकविरोधी ग्रेनेड्‌स व क्षेपणास्त्रे वापरत असताना दिसून येत आहेत. हा युद्धसराव सुमारे 11 तास चालल्याचे स्पष्ट झाले आहे.

सिक्कीममध्ये भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेला तणाव शिगेला पोचला असताना ही स्थिती हिवाळा संपेपर्यंत कायम राहण्याची शक्‍यता आहे. भारताने कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेण्यास नकार दिल्याने चीनची कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या तरी या लष्करी कुरघोडीमध्ये भारताने आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

भारत-चीन-भूतान या देशांच्या सीमा या परिसरात परस्परांशी मिळत असल्याने तिन्ही देशांनी याबाबत बोलणी केली पाहिजेत, अशी भूमिका भारताने घेतली असून याबाबत 2012 मध्ये झालेल्या कराराचा आधार भारताने घेतलेला आहे. चीनने ही भूमिका अमान्य केली आहे.