जगातील सर्वांत मोठी अवकाश दुर्बीण तयार

जगातील सर्वांत मोठी अवकाश दुर्बीण तयार

परग्रहावरील सृष्टीचाही वेध शक्‍य असल्याचा खगोल शास्त्रज्ञांचा दावा 
वॉशिंग्टन - अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था "नासा'ने जगातील सर्वांत मोठी अवकाशातील दुर्बीण तयार करण्याचा आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला आहे. "जेम्स वेब' असे या दुर्बिणीला नाव दिले असून, ती 2018 मध्ये अवकाशात कार्यरत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही दुर्बीण मागील 26 वर्षांपासून कार्यरत असलेल्या हबल या दुर्बिणीची जागा घेणार आहे. 
 

या दुर्बिणीद्वारे परग्रहावरील जीवसृष्टीचाही वेध घेणे शक्‍य होणार असल्याचा दावा काही शास्त्रज्ञांनी केला आहे. "जेम्स वेब'ची निर्मिती पूर्ण झाली असून, तिच्या काही चाचण्या होणे अद्याप बाकी आहेत. या दुर्बिणीचा मुख्य भाग असल्या "प्रायमरी मिरर'वर तंत्रज्ञांनी नुकताच अंतिम हात फिरवला आहे. ही दुर्बीण कार्यरत झाल्यावर ती 3.5 अब्ज वर्षे पूर्वीच्या घटनांचा वेध घेऊ शकणार आहे. म्हणजेच, विश्‍वाच्या निर्मितीनंतरच्या घटनांची आतापर्यंत माहीत नसलेली माहिती या दुर्बिणीद्वारे मिळणार आहे. तब्बल वीस वर्षांच्या प्रयत्नांनंतर ही दुर्बीण तयार करण्यात आली आहे. ही दुर्बीण "नासा'ने युरोपीय स्पेस एजन्सी आणि कॅनडाच्या अवकाश संस्थेच्या साह्याने तयार केली आहे. 
 

'नासा'च्या हबल या दुर्बिणीपेक्षा शंभरपट अधिक "जेम्स वेब'ची क्षमता असून, हबलपेक्षा ही तिप्पट मोठी आहे. म्हणूनच या दुर्बिणीला "सुपर हबल' असे टोपण नाव मिळाले आहे. निर्मिती पूर्ण झाली असली, तरी "जेम्स वेब'ला काही चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे. अवकाश उड्डाणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आवाजाच्या आणि कंपाच्या चाचणीबरोबरच अवकाशातील वातावरणामध्ये टिकण्याच्या दृष्टीने क्रायोजेनिक चाचणीही या दुर्बिणीवर केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. या दुर्बिणीचा मुख्य आरसा हा अठरा षट्‌कोनी आरशांपासून बनला असून, हे आरसे बेरिलियमपासून तयार केले आहेत. किरणोत्सारी किरणांचे परावर्तन प्राप्त करण्यासाठी या आरशांवर सोन्याचा अत्यंत पातळ थर लावला आहे. 

'जेम्स वेब'ची वैशिष्ट्ये 
- 100 पट : हबलपेक्षा सक्षम 
- 3 पट : हबलहून मोठी 
- 18 : षट्‌कोनी आरसे 
- 46 पौंड : प्रत्येक आरशाचे वजन 
- सूर्यकिरणांचा सामना करू शकणारे अत्युच्च दर्जाचे कॅमेरे 
- टेनिसच्या मैदानाच्या आकाराची पाच थरांची "ढाल' दुर्बिणीचे रक्षण करण्यासाठी सज्ज 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com