मेलानिया ट्रम्पला 'सेक्स वर्कर' म्हणणे पडले महागात

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

ब्रिटनमधील 'डेली मेल' या वृत्तपत्राला या प्रकरणी मेलानिया यांची माफी मागावी लागली असून, त्यांना भरपाईपोटी 29 लाख अमेरिकन डॉलर एवढी रक्कम दिली आहे.

लंडन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्या मॉडेलिंग करियरबद्दल प्रश्न उपस्थित करत त्यांना 'एस्कॉर्ट' (सेक्स वर्कर) म्हणणे ब्रिटनमधील वृत्तपत्राला महागात पडले आहे. 

ब्रिटनमधील 'डेली मेल' या वृत्तपत्राला या प्रकरणी मेलानिया यांची माफी मागावी लागली असून, त्यांना भरपाईपोटी 29 लाख अमेरिकन डॉलर एवढी रक्कम दिली आहे. अमेरिकेच्या प्रथम महिला नागरिक असलेल्या मेलानिया यांनी फेब्रुवारीमध्ये या वृत्तपत्राविरोधात मानहानीचा दावा दाखल करत 15 कोटी डॉलरची भरपाई मागितली होती. मेलानिया यांनीही डेली मेलचा माफीनामा स्वीकार केला आहे.

डेली मेलने मेलानिया यांच्या मॉडेलिंग करियरविषयी प्रश्न उपस्थित केले होते. तसेच त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रात छापलेल्या लेखात त्या सेक्स वर्कर म्हणून काम करत होत्या, असा उल्लेख केला होता. त्यानंतर हा लेख मागे घेण्यात आला होता. अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुका सुरु असताना हा लेख प्रसिद्ध झाला होता. 46 वर्षीय मेलानिया यांचा जन्म स्लोवेनियामध्ये झाला, त्यानंतर त्या 1990 मध्ये मॉडेलिंगसाठी अमेरिकेत स्थायिक झाल्या. त्यांनी 2005 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत विवाह केला.

Web Title: Daily Mail pays Melania Trump $2.9 million to settle lawsuit