दलाई लामा अरुणाचलला जाणारच: भारत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

भारतामधील अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांनी अरुणाचलला नुकत्याच दिलेल्या भेटीमुळेही चीनने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. भारत व चीनमधील सीमारेषेच्या वादामध्ये अमेरिकेने नाक खुपसू नये, असा कडक इशाराही चीनकडून देण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर लामा यांच्या तवांग भेटीमुळे भारत व चीन संबंध अधिक तणावग्रस्त होण्याची भीती व्यक्‍त करण्यात आली होती

नवी दिल्ली - तिबेटमधील जनतेचे श्रद्धास्थान असलेले जगप्रसिद्ध धार्मिक गुरु दलाई लामा हे पुढील वर्षीच्या मार्च महिन्यात अरुणाचल प्रदेशमधील तवांग येथे ठरल्याप्रमाणे भेट देतील, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या निमंत्रणावरुन लामा हे तवांगला भेट देणार आहेत. 

लामा यांच्या भेटीची घोषणा याआधीच करण्यात आली होती; मात्र चीनने यास आक्षेप घेतला होता. भारतामधील अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांनी अरुणाचलला नुकत्याच दिलेल्या भेटीमुळेही चीनने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. भारत व चीनमधील सीमारेषेच्या वादामध्ये अमेरिकेने नाक खुपसू नये, असा कडक इशाराही चीनकडून देण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर लामा यांच्या तवांग भेटीमुळे भारत व चीन संबंध अधिक तणावग्रस्त होण्याची भीती व्यक्‍त करण्यात आली होती. मात्र भारताने चीनच्या या भूमिकेकडे दुर्लक्ष केले आहे. 

लामा हे भारताचे पाहुणे असून देशामध्ये कोठेही प्रवास करण्याचे त्यांना स्वातंत्र्य असल्याची प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते विकास स्वरुप यांनी व्यक्‍त केली आहे. 

 ""दलाई लामा हे अध्यात्मिक गुरु आहेत. अरुणाचलमधील बुद्धधर्मीयांची त्यांच्यावर श्रद्धा आहे. लामा यांचा आशीर्वाद घेण्याची त्यांची इच्छा आहे. शिवाय, लामा यांनी याआधीही अरुणाचलला भेट दिली आहे; आणि आताही लामा यांच्या पुन्हा भेट देण्यामध्ये वावगे असे काही नाही,‘‘ असे स्वरुप म्हणाले. तिबेटमधील बुद्धर्मीयांसाठी तवांगचे विशेष महत्त्व आहे. चीनने 1959 मध्ये तिबेटवर हल्ला केल्यानंतर लामा यांनी तवांगमध्येच आश्रय घेतला होता. 

Web Title: Dalai Lama to visit Tawang