चीनच्या इशाऱ्यास भारताच्या वाटाण्याच्या अक्षता

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मार्च 2017

दलाई लामा यांच्या अरुणाचल दौऱ्यामुळे भारत चीनमधील संबंधांस मोठा फटका बसेल, असा इशारा चीनकडून देण्यात आला होता. मात्र लामा हे अरुणाचल प्रदेश येथे केवळ "धार्मिक नेते' म्हणून जात असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजु यांनी म्हटले आहे...

नवी दिल्ली - तिबेटचे अध्यात्मिक गुरु असलेल्या दलाई लामा यांच्या पुढील महिन्यामधील अरुणाचल प्रदेश भेटीदरम्यान केंद्र सरकारचे प्रतिनिधी त्यांची भेट घेणार असल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. चीनने यासंदर्भात दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय भारताकडून घेण्यात आला आहे.

"एक धर्मनिरपेक्ष लोकशाही म्हणून भारत लामा यांना देशातील कुठल्याही भागास भेट देण्यापासून रोखणार नाही,' अशी सूचक भूमिका भारताकडून स्पष्ट करण्यात आली आहे. चीनचे पाकिस्तानबरोबरील वाढती जवळिक; आणि जागतिक स्तरावर भारताची सतत अडवणूक करण्यासंदर्भातील चीनच्या धोरणाच्या पार्श्‍वभूमीवर भारताकडून उचलण्यात आलेले हे पाऊल संवेदनशील मानण्यात येत आहे.

लामा हे तब्बल आठ वर्षांच्या काळानंतर तवांग येथील बौद्ध मठास भेट देणार आहेत. दलाई लामा यांच्या अरुणाचल दौऱ्यामुळे भारत चीनमधील संबंधांस मोठा फटका बसेल, असा इशारा चीनकडून देण्यात आला होता. मात्र लामा हे अरुणाचल प्रदेश येथे केवळ "धार्मिक नेते' म्हणून जात असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजु यांनी म्हटले आहे.

रिजिजु हे स्वत: अरुणाचल प्रदेशचे असून भारताच्या सध्याच्या तिबेटविषयक धोरणामध्ये त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जात आहे.