बांगलादेशात सहा जणांना फाशीची शिक्षा

बांगलादेशात सहा जणांना फाशीची शिक्षा

1971च्या युद्धावेळी नरसंहार केल्याप्रकरणी ठरविले दोषी

ढाका: बांगलादेशात 1971मध्ये झालेल्या नरसंहार प्रकरणात पाकिस्तानी सैनिकांना मदत केल्याबद्दल आणि मानवताविरोधी गुन्ह्यांबद्दल बांगलादेशच्या विशेष आंतरराष्ट्रीय न्यायिक लवादाने सहा इस्लामी मूलतत्त्ववाद्यांना आज फाशीची शिक्षा ठोठावली. यात जमाते इस्लामीच्या एका माजी संसद सदस्याचा समावेश आहे.

बांगलादेशच्या त्रिसदस्यीय आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने (आयसीटी- बीडी) आज मूलतत्त्ववादी पक्ष जमाते इस्लामीशी संबंधित सहा जणांना फाशीची शिक्षा ठोठावली. या सहा जणांच्या विरोधातील सर्व आरोप सिद्ध झाले असल्याचे लवादाने म्हटले आहे. 1973च्या आंतराष्ट्रीय गुन्हे कायद्यानुसार ही शिक्षा सुनावण्यात आल्याचे लवादाने स्पष्ट केले. लवादाचे अध्यक्ष न्यायाधीश शाहिनूर इस्लाम यांनी शिक्षेची माहिती दिली. 1971च्या बांगलादेश मुक्तीसंग्रामातील युद्ध गुन्हेगारांना शिक्षा ठोठविण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुन्हे लवाद 2010मध्ये स्थापन करण्यात आला होता. तेव्हापासून हा खटला सुरू होता. बांगलादेश मुक्तीसंग्रामाला विरोध करत जमाते इस्लामी पक्षाने पाकिस्तानी सैनिकांबरोबर हातमिळवणी केली होती. त्या वेळी मोठा नरसंहार घडवून आणण्यात आला होता.

आज फाशीची शिक्षा झालेल्यांपैकी जमाते इस्लामीचा माजी संसद सदस्य अबू सालेह मोहम्मद अब्दुल अझिझ मिर्झा यानेच प्रत्यक्ष खटल्याचा सामना केला. इतर पाच जण फरार असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत खटला चालविण्यात आला. विशेष कायद्यानुसार लवादाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाच्या अपिलीय विभागात आव्हान देण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

बांगलादेशने आत्तापर्यंत 1971च्या युद्धातील सहा गुन्हेगारांना फाशी दिली आहे. त्यापैकी पाच जण जमाते इस्लामीचे नेते होते, तर एक जण बांगलादेश राष्ट्रीय पार्टीचा नेता होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com