ट्रम्प यांनी मोडली व्हाईट हाऊसमधील "इफ्तार' परंपरा...

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जून 2017

अमेरिकेचे इतिहासप्रसिद्ध राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांनी डिसेंबर 1805 मध्ये ट्युनिशियाचे राजदूत सिदी सोलिमान मेल्लिमेली यांच्या सन्मानार्थ व्हाईट हाऊसमध्ये अशा स्वरुपाची मेजवानी आयोजित केल्याचे मानले जाते. या घटनेसंदर्भात अमेरिकेमध्ये दोन मतप्रवाह आहेत

वॉशिंग्टन - मुस्लिमधर्मीयांचा पवित्र सण असलेल्या रमजाननिमित्त व्हाईट हाऊसमध्ये मेजवानी (इफ्तार) देण्याची परंपरा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोडीत काढली आहे. या परंपरेस दोन शतकांपेक्षाही अधिक काळाचा संदर्भ आहे.

रमजानच्या सणानिमित्त सूर्यास्तास ही मेजवानी देण्याची प्रथा आहे. यासाठी व्हाईट हाऊसकडून सुमारे महिन्याभरापासून तयारी करण्यात येते. अमेरिकेचे याआधीचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, जॉर्ज बुश व बिल क्‍लिंटन यांच्या कार्यकाळात दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या वर्षी ही मेजवानी आयोजित करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमेरिकेचे इतिहासप्रसिद्ध राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांनी डिसेंबर 1805 मध्ये ट्युनिशियाचे राजदूत सिदी सोलिमान मेल्लिमेली यांच्या सन्मानार्थ व्हाईट हाऊसमध्ये अशा स्वरुपाची मेजवानी आयोजित केल्याचे मानले जाते. या घटनेसंदर्भात अमेरिकेमध्ये दोन मतप्रवाह आहेत. ही मेजवानी केवळ राजशिष्टाचार म्हणून आयोजित करण्यात आली होती; तसेच पाहुण्यांसाठी मेजवानीमधील अन्नपदार्थ बदलण्यात आले नव्हते, असा दावा उजव्या विचारवंतांकडून करण्यात येतो.

1996 मध्ये, अमेरिकेच्या तत्कालीन "फर्स्ट लेडी' हिलरी क्‍लिंटन यांनी व्हाईट हाऊसमध्ये 150 पाहुण्यांना इफ्तार मेजवानी दिली होती. यानंतचे राष्ट्राध्यक्ष बुश व ओबामा यांच्या काळातही दरवर्षी मेजवानी देण्यात आली होती. मात्र ट्रम्प प्रशासनाने ही परंपरा मोडीत काढली आहे.