गप्प बसणार नाही- ट्रम्प यांचा उत्तर कोरियाला इशारा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

अमेरिका निमूटपणे सर्व ऐकून घेईल असा गैरसमज कोरियाने करून घेऊ नये असा स्पष्ट इशारा ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला दिला आहे.  

वॉशिंग्टन : अणुऊर्जा आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमावर उत्तर कोरियाशी मोठा संघर्ष होऊ शकतो. अमेरिका शांत बसणार नाही, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. दरम्यान, आपण या वादावर राजनैतिक चर्चेच्या मार्गाने तोडगा काढण्यास प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष होऊन १०० दिवस पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त ट्रम्प यांनी रॉयटर्सला दिलेल्या विशेष मुलाखातीत उत्तर कोरियाला हा इशारा दिला आहे. 
अमेरिका व उत्तर कोरिया यांच्यादरम्यानचा संघर्ष मागील काही दिवसांपासून पेटला आहे. अणूहल्ला करण्याचाही विचार करीत असल्याचा इशारा उत्तर कोरियाने अमेरिकेला दिला होता. त्यावर ट्रम्प यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, दोन्ही देशांतील सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी चर्चेला प्राधान्य देण्यात येईल. परंतु, अमेरिका निमूटपणे सर्व ऐकून घेईल असा गैरसमज कोरियाने करून घेऊ नये असा स्पष्ट इशारा ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला दिला आहे.