ट्रम्प यांची प्रकृती ठणठणीत

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जानेवारी 2018

अध्यक्ष ट्रम्प यांचे आरोग्य उत्तम आहे. त्यामुळे ते आपल्या जबाबदाऱ्या निर्धारीत काळात योग्य पणे पार पाडू शकतात, असे डॉ. जॅक्‍सन यांनी स्पष्ट केले. लष्कराच्या वैद्यकीय पथकाने शुक्रवारी ही तपासणी केली. आकलन क्षमता चाचणी घेण्याची विनंती ट्रम्प यांनी स्वतः केली होती, त्यानुसार ती घेण्यात आली, असे डॉ. जॅक्‍सन म्हणाले

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती आज "व्हाइट हाउस'च्या वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. ट्रम्प यांच्या मानसिक क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणी केली असता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे दिसून आल्याचे डॉक्‍टरांनी स्पष्ट कले. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर 71 वर्षीय ट्रम्प यांची प्रथमच वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

""ट्रम्प यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यात त्यांची आकलनात्मक क्षमता आणि मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत सुरू असल्याचे निदर्शनास आले,'' अशी माहिती नौदलाचे रिअर ऍडमिरल डॉ. रॉनी जॅक्‍सन यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. अध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांची पहिल्यांदाच वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, अध्यक्षपदाचा कारभार सांभाळण्यासाठी ट्रम्प यांचे मानसिक आरोग्य उत्तम असल्याचे वैद्यकीय माहितीवरून दिसून येते, असे जॅक्‍सन यांनी या वेळी सांगितले.

ट्रम्प यांच्या मानसिक आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे दावे एका पुस्तकाच्या आधारे करण्यात आले आहेत. ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांनाही त्यांचे आरोग्य आणि क्षमतांबद्दल काळजी वाटत असल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यामुळे ट्रम्प हे अध्यक्षपदाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याच्या स्थितीत आहेत का? याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांचे निष्कर्षही डॉक्‍टरांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

अध्यक्ष ट्रम्प यांचे आरोग्य उत्तम आहे. त्यामुळे ते आपल्या जबाबदाऱ्या निर्धारीत काळात योग्य पणे पार पाडू शकतात, असे डॉ. जॅक्‍सन यांनी स्पष्ट केले. लष्कराच्या वैद्यकीय पथकाने शुक्रवारी ही तपासणी केली. आकलन क्षमता चाचणी घेण्याची विनंती ट्रम्प यांनी स्वतः केली होती, त्यानुसार ती घेण्यात आली, असे डॉ. जॅक्‍सन म्हणाले. कायद्यानुसार अध्यक्षांची आकलन क्षमता चाचणी घेण्याची गरज नाही, मात्र ट्रम्प यांनी स्वतःहून त्यास तयारी दर्शविली, असेही ते म्हणाले.

स्मृतीभृंशाचा विकार असलेल्या व्यक्तींची, विशेषतः वयोवृद्ध नागरिकांची आकलनक्षमतेची चाचणी घेण्यात येते.

Web Title: donald trump usa health