...तर पाकिस्तानही संयम बाळगणार नाही: आसिफ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

भारतासोबतचे सध्याचे संबध हे सध्या तणावग्रस्त आहेत. पाकिस्तानकडून हे संबध सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे; परंतु भारताकडून यासाठी हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. काश्‍मीरमध्ये काय चालले आहे, हे पाहणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे

वॉशिंग्टन - भारताने पाकिस्तानमधील आण्विक प्रकल्पांवर हला करु नये, असा इशारा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिला आहे. पाकिस्तानवर "सर्जिकल स्ट्राईक' करण्यात आल्यास पाकिस्तान संयम बाळगेल अशी अपेक्षा कोणीही ठेवू नये, असे आसिफ यांनी अमेरिकेमधील एका "थिंक टॅंक'मध्ये बोलताना सांगितले. भारतीय हवाईदल कुठल्याही प्रकारच्या कारवाईसाठी तयार असल्याचे विधान भारतीय हवाई दल प्रमुख बी एस धनोआ यांनी नुकतेच केले आहे. या संदर्भात बोलताना आसिफ यांनी पाकिस्तान आपल्या शेजारी देशाबरोबर मैत्रीचे आणि सलोख्याचे संबध ठेवू इच्छित असल्याचे स्पष्ट केले.

"भारतासोबतचे सध्याचे संबध हे सध्या तणावग्रस्त आहेत. पाकिस्तानकडून हे संबध सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे; परंतु भारताकडून यासाठी हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. काश्‍मीरमध्ये काय चालले आहे, हे पाहणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे,'' असे आसिफ म्हणाले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानने दहशतवादी गटांना आश्रय दिल्याची टीका केली आहे. आसिफ यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना द्विपक्षीय संबध सुधारण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीचाही उल्लेख त्यांनी केला. दोन देशांमध्ये जास्तीत जास्त संपर्क वाढवण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.