राजकीय उद्दिष्टांसाठी "डोकलाम'चा वापर नको: चीनचा भारताला इशारा

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जुलै 2017

सिक्कीमधील भारत-चीन सीमा दोन्ही देशांच्या सहमतीने मान्य करण्यात आली आहे. तरीही भारतीय सैन्याने चिनी हद्दीत प्रवेश केला. हे सैन्य त्यांनी तातडीने माघारी घ्यावे. तसेच, या वादाचा धोरण म्हणून उपयोग करत आपले राजकीय उद्दीष्ट साध्य करू नये.

बीजिंग - आपली राजकीय उद्दीष्ट्ये गाठण्यासाठी भारताने डोकलाम वादाचा धोरण म्हणून वापर करू नये, असा इशारा चीनने आज (मंगळवार) भारताला दिला आहे. तसेच, अधिक तणाव टाळण्यासाठी या भागातून तातडीने सैन्य माघारी घेण्याचे आवाहनही चीनने केले आहे.

याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कॅंग म्हणाले की, सिक्कीमधील भारत-चीन सीमा दोन्ही देशांच्या सहमतीने मान्य करण्यात आली आहे. तरीही भारतीय सैन्याने चिनी हद्दीत प्रवेश केला. हे सैन्य त्यांनी तातडीने माघारी घ्यावे. तसेच, या वादाचा धोरण म्हणून उपयोग करत आपले राजकीय उद्दीष्ट साध्य करू नये. भारतीय सैनिकांनी चीनच्या हद्दीत बेकायदा प्रवेश केल्याने अनेक देशांच्या राजदूतांना धक्का बसल्याने त्यांना या बाबत माहिती सांगण्यात आली आहे. या सर्वांशी चीन सरकार संपर्क ठेवून आहे, असेही कॅंग यांनी सांगितले. चीनने गेल्या आठवड्यात विविध राजदूतांची बैठक बोलावून त्यांच्यासमोर आपली बाजू मांडल्याचे समजते.

सिक्कीममध्ये भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेला तणाव शिगेला पोचला असताना ही स्थिती हिवाळा संपेपर्यंत कायम राहण्याची शक्‍यता आहे. भारताने कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेण्यास नकार दिल्याने चीनची कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या तरी या लष्करी कुरघोडीमध्ये भारताने आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

भारत-चीन-भूतान या देशांच्या सीमा या परिसरात परस्परांशी मिळत असल्याने तिन्ही देशांनी याबाबत बोलणी केली पाहिजेत, अशी भूमिका भारताने घेतली असून याबाबत 2012 मध्ये झालेल्या कराराचा आधार भारताने घेतलेला आहे. चीनने ही भूमिका अमान्य केली आहे.