इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष 

वृत्तसंस्था
सोमवार, 8 मे 2017

सर्वांत कमी मतदान

फ्रान्सच्या अध्यक्षपदासाठी काल 65.3 टक्के (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत) मतदान झाले. अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी 1969 नंतर हे सर्वांत कमी मतदान आहे. उजव्या विचारसरणीच्या नॅशनल फ्रंट पक्षाच्या नेत्या मरीन ल पेन आणि एन मार्श या पक्षाचे संस्थापक इमॅन्युएल मॅक्रॉन हे रिंगणात होते.

पॅरिस : फ्रान्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इमॅन्युएल मॅक्रॉन यांना जनतेने कौल दिला आहे. मॅक्रॉन यांनी उजव्या विचारसरणीच्या मरीन ल पेन यांचा पराभव केला. मॅक्रॉन हे नेपोलियन बोनापार्टनंतरचे फ्रान्सचे सर्वांत तरुण नेते ठरले आहेत. 

रात्री उशिरा झालेल्या प्राथमिक अंदाजातच हे चित्र स्पष्ट झाले होते. मॅक्रॉन हे माजी इन्व्हेस्टमेंट बॅंकर असून, ते 39 वर्षांचे आहेत. देशाचे ते सर्वांत तरुण अध्यक्ष ठरणार आहेत. प्राथमिक अंदाजानुसार मॅक्रॉन यांना 65.5 ते 66.1 टक्के आणि ल पेन यांना 33.9 ते 34.5 टक्के मते मिळाली आहेत. मॅक्रॉन यांच्यासमोर आता फ्रान्स आणि युरोपीय समुदायाच्या राजकीय व आर्थिक सुधारणांचा अजेंडा असेल. 

फ्रान्सच्या अध्यक्षपदासाठी काल 65.3 टक्के (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत) मतदान झाले. अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी 1969 नंतर हे सर्वांत कमी मतदान आहे. उजव्या विचारसरणीच्या नॅशनल फ्रंट पक्षाच्या नेत्या मरीन ल पेन आणि एन मार्श या पक्षाचे संस्थापक इमॅन्युएल मॅक्रॉन हे रिंगणात होते.

पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मतदानाच्या पहिल्या फेरीत इतर सर्व उमेदवारांमध्ये या दोघांनीच आघाडी घेतली होती. त्यामुळे स्पष्ट बहुमतासाठी आज 'रन ऑफ' फेरी झाली. मतदानानंतर कोणता उमेदवार निवडून येईल, याबाबत फ्रान्समध्ये प्रचंड उत्सुकता होती.