मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी मोदींचे थेरेसा मेंना साकडे 

वृत्तसंस्था
शनिवार, 8 जुलै 2017

विशेष म्हणजे सध्या ब्रिटनमधील मॅजिस्ट्रेट कोर्टात मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भातील खटला सुरू असून, शुक्रवारी या खटल्याच्या पुढील सुनावणीसाठी 4 डिसेंबर ही तारीख निश्‍चित करण्यात आली आहे. मल्ल्यासंदर्भात भारत सरकारने पाठवलेली कागदपत्रे आणि आर्थिक हेराफेरीचे अन्य पुरावे ब्रिटनच्या "क्राऊन प्रोसक्‍युशन सर्व्हिस'ने पडताळून पाहिले आहेत.

नवी दिल्ली - जर्मनीतील हॅम्बर्ग येथे "जी-20' देशांच्या संमेलनामध्ये सहभागी झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची भेट घेत त्यांच्याशी आर्थिक गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणाबाबत चर्चा केली. भारतात गुन्हे करून पळून जाणाऱ्या गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणामध्ये ब्रिटनने सहकार्य करावे, असे मोदी यांनी म्हटले आहे. 

या वेळी त्यांच्या बोलण्याचा रोख हा फरार मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या दिशेने होता. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. 

विशेष म्हणजे सध्या ब्रिटनमधील मॅजिस्ट्रेट कोर्टात मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भातील खटला सुरू असून, शुक्रवारी या खटल्याच्या पुढील सुनावणीसाठी 4 डिसेंबर ही तारीख निश्‍चित करण्यात आली आहे. मल्ल्यासंदर्भात भारत सरकारने पाठवलेली कागदपत्रे आणि आर्थिक हेराफेरीचे अन्य पुरावे ब्रिटनच्या "क्राऊन प्रोसक्‍युशन सर्व्हिस'ने पडताळून पाहिले आहेत. सध्या मल्ल्या हे सशर्त जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. त्याच्या संदर्भातील आणखी एका खटल्याची सुनावणी 14 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे समजते. मल्ल्या याने मार्च 2016 मध्ये ब्रिटनमध्ये पलायन करत "हर्टफोर्डशायर'मध्ये आश्रय घेतला होता. विविध बॅंकांचे 9 हजार कोटी रुपये बुडवून मल्ल्याने परदेशी पलायन केले आहे.