विज्ञान शलाकेचा अस्त

stephen-hawking
stephen-hawking

लंडन - जगविख्यात सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग (वय ७६) यांचे केंब्रिज विद्यापीठानजीक असलेल्या निवासस्थानी आज निधन झाले. हॉकिंग यांनी कृष्णविवरे आणि सापेक्षता सिद्धांताच्या संदर्भातील संशोधन मुख्यत्वे ज्या ठिकाणी केले, त्याच निवासस्थानामध्ये हॉकिंग यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली.

व्हीलचेअरवर बसून ब्रह्मांडातील अनेक रहस्यांचा उलगडा करणाऱ्या हॉकिंग यांचे संपूर्ण आयुष्य जगभरातील अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरले होते.

आमच्या वडिलांच्या निधनामुळे आम्ही शोकसागरात बुडालो आहोत. ते एक महान शास्त्रज्ञ आणि असामान्य व्यक्ती होते. त्यांचे कार्य आणि वारसा अनेक वर्षे इतरांना मार्गदर्शन करत राहील. त्यांचे धैर्य, चिकाटी, बुद्धिमत्ता आणि विनोदबुद्धी जगभरातील अनेकांना प्रेरणा देत राहील, असे हॉकिंग यांची मुले ल्युसी, रॉबर्ट आणि टीम यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

हॉकिंग यांचा जन्म इंग्लंडमधील ऑक्‍सफर्ड येथे आठ जानेवारी १९४२ रोजी झाला होता. संशोधनाचे बाळकडू हॉकिंग यांना घरातूनच मिळाले होते. प्रसिद्ध ऑक्‍सफर्ड विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात हॉकिंग यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. त्यानंतर उच्चशिक्षणासाठी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेत तेथूनच पीएच.डी. पूर्ण केली. अवकाशात कृष्णविवरे कशी तयार होतात, विश्वाची निर्मिती कशा प्रकारे झाली, अशा अनेक महत्त्वाच्या गूढ प्रश्नांची उकल करण्यात हॉकिंग यांनी आपले आयुष्य समर्पित केले. 

वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी १९६३मध्ये हॉकिंग यांना ‘मोटर न्यूरॉन’ हा आजार असल्याचे निदान झाले. त्यानंतर ते फक्त काही वर्षे जगू शकतील अशी शक्‍यता डॉक्‍टरांनी वर्तविली होती. मात्र, प्रचंड धाडसी असलेल्या हॉकिंग यांनी अत्यंत खंबीरपणे या आजाराचा मुकाबला केला, त्यामुळे व्हीलचेअरवर बसून संगणकाच्या माध्यमातून इतरांशी संवाद साधणारा हा शास्त्रज्ञ जिवंतपणीच एक दंतकथा बनला होता. अजारपणामुळे आलेल्या मर्यादांवर मात करत हॉकिंग यांनी आपले संशोधन कार्य सुरूच ठेवले. एका हाताच्या फक्त काही बोटांची ते हालचाल करू शकत होते, त्यामुळे व्हीलचेअरवर असलेल्या हॉकिंग यांना सर्वच गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत होते.

प्रतिक्रिया -
स्टीफन हॉकिंग यांचे ‘अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम’ पुस्तक गाजले. मला असे वाटत नाही, ते सामान्यांना समजेल. परंतु लेखकाबद्दल सर्वसामान्यांना जिज्ञासा, कौतुक होते, त्यातून ते पुस्तक घेऊन वाचायचा प्रयत्न केला. मला असे वाटते की, हा भाग महत्त्वाचा आहे. लोकांना विज्ञानाची भीती वाटू नये, त्यांना विज्ञानात काही शिकण्याजोगे आहे, असे वाटावे, अशा प्रकारचे लिखाण केले तर ते चांगले उपयोगी पडते हे हॉकिंग यांच्या उदाहरणावरून लक्षात येते. 
- डॉ. जयंत नारळीकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

ब्रह्मांडाचे रहस्य उलगडण्यासाठी स्टीफन हॉकिंग यांनी मोठे योगदान दिले.
- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

हॉकिंग हे बुद्धिमान शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक होते. त्यांचे कार्य जगभरातील अनेकांना सदैव प्रेरणा देत राहील.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान  

मानवी जिद्दीचा आदर्श
अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्यानंतर सामान्य नागरिकांच्या प्रेमाचा आणि कुतूहलाचा विषय झालेले शास्त्रज्ञ म्हणजे स्टीफन हॉकिंग. त्यांनी जे शोध लावले ते व्हीलचेअरवर बसून. अपंगत्व आले तरी जिद्दीने त्यांनी संशोधनकार्याला वाहून घेतले. त्यांनी विश्‍वाचा वेध घेतला. मानवी जिद्दीचे ते ज्वलंत उदाहरण आहे. त्यांचे संशोधन ही जगासाठी मोठी ठेव आहे. माणसात जिद्द असेल तर तो काय ‘चमत्कार’ घडवू शकतो, याचे लखलखीत उदाहरण म्हणजे हॉकिंग यांचे कार्य.
- डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

शब्देविण संवादू
मुंबईतील त्यांचे भाषण ऐकण्यासाठी मी गेलो होतो. षण्मुखानंद हॉलमधील या भाषणाला प्रचंड गर्दी होती. व्हीलचेअरवरील या तपस्वी संशोधकाला ऐकून लोक भारावून गेले होते. भाषण आटोपून त्यांची गाडी निघाली होती, तेवढ्या मुंबईतील ‘पॅराप्लेजिक संस्थे’तील अनेक जण त्यांना भेटायला आले आहेत, हे समजताच त्यांनी गाडी थांबविली. ते बोलू शकत नव्हते. पण ‘शब्देविण संवादू’ असे घडले. त्यांना पाहून भेटायला आलेल्या सर्वांनाच धन्यता वाटली. तो क्षण मी कधीही विसरू शकत नाही. 
 - डॉ. प्रकाश तुपे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com