बिलावल भुट्टोंच्या लग्नावरुन पाकिस्तानात चिंता!

वृत्तसंस्था
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

माझ्या बहिणी निवडतील तिलाच पत्नी म्हणून स्वीकारेन, असेही बिलावल यांनी यावेळी सांगितले. माझ्या बहिणी निवडतील ती तरुणी अत्यंत नशीबवान असेल, अशी प्रतिक्रियाही पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख असलेल्या बिलावल यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना व्यक्त केली!

नवी दिल्ली - "मला आत्तापर्यंत अनेक वेळा लग्नाचे प्रस्ताव आले आहेत; मात्र मी ते सर्व फेटाळून लावले आहेत,'' अशी माहिती पाकिस्तानी राजकारणातील अत्यंत महत्त्वपूर्ण कुटूंब असलेल्या भुट्टोंपैकी एक असलेल्या बिलावल यांनी दिली आहे. माझ्या बहिणी निवडतील तिलाच पत्नी म्हणून स्वीकारेन, असेही बिलावल यांनी यावेळी सांगितले. माझ्या बहिणी निवडतील ती तरुणी अत्यंत नशीबवान असेल, अशी प्रतिक्रियाही पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख असलेल्या बिलावल यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना व्यक्त केली!

पाकिस्तानमधील नवाझ शरीफ सरकारमध्ये मंत्री असलेल्या अबिद शेर अली यांनी नुकतेच प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असल्याचे मत व्यक्त करत बिलावल यांनी पूर्ण वेळ राजकारणात येण्याआधी लग्न करावे, असा सल्ला दिला होता. याचबरोबर, अली यांनी क्रिकेटपटू व राजकीय नेते असलेल्या इम्रान खान यांच्याप्रमाणे बिलावल यांनी वागू नये, असेही म्हटले होते. इम्रान हे तिसऱ्यांदा वा चौथ्यांदाही घटस्फोट घेण्यास तयार असल्याचा टोला अली यांनी लगावला होता. इम्रान यांचा दोनदा घटस्फोट झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर बिलावल यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

माझ्या बहिणींची मान्यता मिळविणे अत्यंत अवघड असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला! 28 वर्षीय बिलावल यांना विविध पातळीवर देण्यात येणाऱ्या सल्ल्यांमध्ये येथील वृत्तवाहिनी असलेल्या जिओ टीव्हीमधील ज्योतिषीही समाविष्ट आहे. बिलावल यांचे ग्रह चांगले होईपर्यंत त्यांनी लग्न करु नये, असे या ज्योतिषाचे निदान असून; हे ग्रह 2019 साली जुळणार असल्याचे भविष्यही त्याने वर्तविले आहे!