हफीझ सईदचा मेहुणा "जमात'चा नवा म्होरक्‍या

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मार्च 2017

सईद याला अटक करण्यात आल्यानंतर जमातने त्वरित संघटनेचे नाव बदलून "तेहरिक आझादी जम्मु काश्‍मीर' असे केले आहे

लाहोर - पाकिस्तानमधील जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचे नेतेपद आता हफीझ सईद याचा मेहुणा असलेल्या अब्दुल रेहमान मक्की याच्याकडे सोपविण्यात आले आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामागील (26/11) मुख्य सूत्रधार असलेल्या सईद याला पाकिस्तानमधील पंजाब सरकारने नजरकैदेत ठेवल्याच्या पार्श्‍वभूमीवर मक्की हा जमातचा नवा म्होरक्‍या बनला आहे.

सईद याला नजरकैदेत ठेवल्यानंतर मक्की याने लाहोर व पाकिस्तानच्या इतर भागांत काढण्यात आलेल्या मोर्चांचे नेतृत्व केले होते. सईद व जमातच्या इतर चार म्होरक्‍यांना गेल्या 30 जानेवारीपासून 90 दिवसांच्या नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. सईद याला अटक करण्यात आल्यानंतर जमातने त्वरित संघटनेचे नाव बदलून "तेहरिक आझादी जम्मु काश्‍मीर' असे केले आहे. सईद याच्यावर 1 कोटी डॉलर्सचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे; तर मक्की याच्यासाठी 20 लाख डॉलर्सचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.

Web Title: Hafiz Saeed's brother-in-law Makki new head of Jamaat-ud-Dawah