हॉर्वर्ड यांनी धुडकावला ट्रम्प यांचा NSAचा प्रस्ताव

पीटीआय
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

फ्लिन यांची सुरक्षा सल्लागार पदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांचे कनिष्ठ सहकारी के.टी. मॅकफरलँड सुरक्षा परिषदेत कायम होते. मॅकफरलँड हे फॉक्स न्यूजचे माजी विश्लेषक आहेत. 

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनण्याचा प्रस्ताव व्हाईस अॅडमिरल रॉबर्ट हॉर्वर्ड यांनी धुडकावून लावला आहे. 
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीन प्रशासनाची घडी बसविण्याचे प्रयत्न सुरू असताना त्यांना हा आणखी एक धक्का बसला आहे. 

या प्रस्तावाबद्दल बोलताना हॉर्वर्ड म्हणाले, "हा पूर्णपणे वैयक्तिक मुद्दा आहे. लष्करात 40 वर्षे व्यतीत केल्यानंतर मी स्वतःचा काही वेळ आनंदात घालविण्याच्या अभूतपूर्व स्थितीत आहे."

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत तुम्ही स्वतःचे लोक नियुक्त करण्याची विनंती केली होती का, असे विचारले असता हॉर्वर्ड म्हणाले, "त्याबाबत अध्यक्ष ट्रम्प बोलतील."
फ्लिन यांची सुरक्षा सल्लागार पदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांचे कनिष्ठ सहकारी के.टी. मॅकफरलँड सुरक्षा परिषदेत कायम होते. मॅकफरलँड हे फॉक्स न्यूजचे माजी विश्लेषक आहेत. 

अमेरिकेतील सत्तांतरादरम्यान रशियाच्या अमेरिकेतील राजदुताशी निर्बंधांबद्दल झालेल्या चर्चेसंदर्भात जनरल मायकेल फ्लिन यांनी उपाध्यक्ष माईक पेन्स यांना चुकीची माहिती दिल्याचे उघड झाले होते. त्यावर ट्रम्प यांनी फ्लिन यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यांच्या जागी हॉर्वर्ड यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव होता.