भारत-पाकमध्ये तणाव कायम; व्यापार मात्र सुधारतोय!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

गेल्या वर्षी राजकीय वातावरणात कडवटपणा असतानाही भारतातून पाकिस्तानमध्ये सर्वाधिक निर्यात झाली. या काळात पाकिस्तानने भारताकडून 1.8 अब्ज डॉलरची आयात केली तर 440 दशलक्ष डॉलरची निर्यात केली.

कराची: भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमधील तणावपूर्ण राजकीय संबंधांची सावली अद्याप दोन्ही देशांतील आर्थिक व्यवहारांवर पडलेली नाही. पाकिस्तान स्टेट बँकेच्या नव्या अहवालातून दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचे सूचित होत आहे. 

या संदर्भात 'डाॅन' या पाकिस्तानमधील वृत्तपत्राने बातमी प्रसिद्ध केली आहे.
पाकिस्तानमध्ये जुलै ते जून असे आर्थिक वर्ष असते. पाकिस्तान स्टेट बँकेच्या या अहवालानुसार, पाकिस्तानी आर्थिक वर्षातील पहिल्या आठ महिन्यांमध्ये म्हणजेच जुलै ते फेब्रुवारीदरम्यान पाकिस्तानमधून भारतात होणारी निर्यात 14 टक्क्यांनी वाढली आहे. याच काळात भारताने पाकिस्तानकडून 286 दशलक्ष डॉलरची आयात केली आहे. याउलट, पाकिस्तानची भारताकडून होणारी आयात 23 टक्क्यांनी कमी झाली आहे. फेब्रुवारीपर्यंत पाकिस्तानने भारताकडून 958.3 दशलक्ष डॉलरची आयात केली.  
अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेतून पाकिस्तानी सिमेंटची मागणी कमी झाली आहे. मात्र, भारतात सिमेंटच्या वाढत्या मागणीमुळे हा नकारात्मक परिणाम काही प्रमाणात कमी झाला आहे. भारतीय बाजारपेठेत पाकिस्तानी उत्पादकांना जम बसविण्यात अपयश आले आहे. त्यामुळे हा आर्थिक व्यापार भारतासाठी अधिक फायदेशीर ठरत आहे. जुलै ते फेब्रुवारीदरम्यान पाकिस्तानची व्यापारी तूट 672 दशलक्ष डॉलरएवढी झाली आहे. त्या आधीच्या आर्थिक वर्षात हे प्रमाण 993 दशलक्ष डॉलरएवढे होते.  

याआधीच्या आर्थिक वर्षात (2015-16) पाकिस्तानने निर्यातीच्या तुलनेत भारताकडून चौपट आयात केली आहे.

गेल्या वर्षी राजकीय वातावरणात कडवटपणा असतानाही भारतातून पाकिस्तानमध्ये सर्वाधिक निर्यात झाली. या काळात पाकिस्तानने भारताकडून 1.8 अब्ज डॉलरची आयात केली तर 440 दशलक्ष डॉलरची निर्यात केली.