भारत अमेरिकेचा अतिशय महत्त्वाचा मित्र - मॅकऔलिफ

पीटीआय
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

भारत हा खूप मोठा देश आहे, त्यामुळे भारतात खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत, त्यामुळे भारताबरोबर संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी तुम्ही भारताला भेट द्यालयाच हवी

वॉशिंग्टन - भारत हा अमेरिकेचा अतिशय महत्त्वाचा मित्र असून, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात भारताने अमेरिकेला मोठी मदत केली आहे, असे मत अमेरिकेतील व्हर्जिनियाचे राज्यपाल मॅकऔलिफ यांनी व्यक्त केले.

अमेरिकेतील अतिशय शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय राज्यपाल परिषदेचे मॅकऔलिफ हे अध्यक्ष आहेत. अमेरिकेतील भारताचे राजदूत नवतेज सरना यांनी अमेरिकेतील राष्ट्रीय राज्यपाल परिषदेच्या सदस्यांसाठी नुकतेच भोजन समारंभाचे आयोजन केले होते. त्या वेळी मॅकऔलिफ यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. या भोजन समारंभाला अमेरिकेतील सुमारे 25 राज्यांचे राज्यपाल सपत्नीक हजर होते.

"पीटीआय'शी बोलताना मॅकऔलिफ म्हणाले, की भारत-अमेरिका संबंधांचे महत्त्व आम्ही जाणतो, त्यामुळे सरना यांनी आयोजित केलेल्या या भोजन समारंभाला मोठ्या संख्येने राज्यपाल उपस्थित आहेत.

भारत हा खूप मोठा देश आहे, त्यामुळे भारतात खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत, त्यामुळे भारताबरोबर संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी तुम्ही भारताला भेट द्यालयाच हवी, असा सल्ला मॅकऔलिफ यांनी या वेळी उपस्थित राज्यपालांना दिला. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांना आज जागतिक पातळीवरही मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे, असे मत सरना यांनी या वेळी व्यक्त केले.
 

Web Title: India important friend for usa