काश्‍मीरप्रश्‍नी हस्तक्षेप नको:भारताने चीनला ठणकावले

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 जुलै 2017

काश्‍मीर हा भारत व पाकिस्तानमधील द्विपक्षीय प्रश्‍न असल्याच्या भारताच्या भूमिकेत तसूभरही फरक पडला नसल्याचे भारताकडून ठणकावून सांगण्यात आले

नवी दिल्ली - काश्‍मीरप्रश्‍नी हस्तक्षेप करण्याचा चीनचा प्रस्ताव भारताकडून आज (गुरुवार) स्प्पष्ट शब्दांत फेटाळण्यात आला. काश्‍मीर हा भारत व पाकिस्तानमधील द्विपक्षीय प्रश्‍न असल्याच्या भारताच्या भूमिकेत तसूभरही फरक पडला नसल्याचे भारताकडून ठणकावून सांगण्यात आले.

भारत व पाकिस्तानमधील संबंध सुधारण्याच्या उद्दिष्टार्थ काश्‍मीरप्रश्‍नी "संरचनात्मक भूमिका' पार पाडण्यास तयारी चीनकडून काल (बुधवार) दाखविण्यात आली होती. याचवेळी, काश्‍मीरप्रश्‍नी पाकिस्तानशी द्विपक्षीय चर्चा करण्याची तयारीही भारताकडून दाखविण्यात आली.

"भारत व पाकिस्तान हे दक्षिण आशियामधील प्रमुख देश आहेत. मात्र काश्‍मीर प्रश्‍नाकडे जागतिक समुदायाचे लक्ष वेधले गेले आहे. काश्‍मीरमधील प्रत्यक्ष ताबारेषेजवळ होत असलेल्या संघर्षामुळे केवळ या दोन देशांमधील संबंधच तणावपूर्ण होत आहेत असे नव्हे; तर एकंदरच या प्रदेशाची शांतता व स्थिरता धोक्‍यात येत आहे,'' असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी म्हटले होते.

भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ चिनी सैन्याने केलेल्या आगळिकीमुळे भारतीय लष्कर व चिनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकल्याने गेल्या काही दिवसांत भारत व चीन संबंध तणावपूर्ण झाल्याचे आढळून आले आहे. याच वेळी चीनकडून करण्यात आलेला काश्‍मीरचा उल्लेख अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.