दहशतवाद्यांमध्ये फरक करु नका: भारताचे राष्ट्रसंघास आवाहन

वृत्तसंस्था
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

दहशतवाद्यांमध्ये आपण फरक करता कामा नये. तालिबान, हक्कानी नेटवर्क, अल कायदा, दाएश, लष्कर-ए-तैयबा, जैश-इ-मोहम्मद आणि अन्य अशा स्वरुपाच्या सर्व संघटना या दहशतवादी संघटनाच आहेत. या दहशतवादी संघटनांच्या कृत्यांचे समर्थन न करता त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे

नवी दिल्ली - अफगाणिस्तानमधील दहशतवादाला मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर निर्बंध आणले जावेत, असे आवाहन भारताकडून संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा समितीस करण्यात आले आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांस मिळणारी आर्थिक मदत रोखण्याबरोबरच पाकिस्तानविरोधातही आंतरराष्ट्रीय पातळीवरुन सक्षम कारवाई केली जावी, अशी मागणी भारताकडून करण्यात आली आहे. अफगाणिस्तान व भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडविणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात सक्षम कारवाईसाठी पाकिस्तानला लक्ष्य करणे आवश्‍यक असल्याची भूमिका भारताकडून स्पष्ट करण्यात आली आहे.

"दहशतवाद्यांमध्ये आपण फरक करता कामा नये. तालिबान, हक्कानी नेटवर्क, अल कायदा, दाएश, लष्कर-ए-तैयबा, जैश-इ-मोहम्मद आणि अन्य अशा स्वरुपाच्या सर्व संघटना या दहशतवादी संघटनाच आहेत. या दहशतवादी संघटनांच्या कृत्यांचे समर्थन न करता त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे,'' असे भारताचे संयुक्त राष्ट्रसंघामधील कायमस्वरुपी प्रतिनिधी सईद अकबरुद्दीन यांनी स्पष्ट केले.

अफगाणिस्तानमधील परिस्थिती ही अत्यंत "वेदनादायी' असून येथील सुरक्षा व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत असल्याचे भारताने म्हटले आहे. अफगाणिस्तानमधील सध्याच्या राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने घेतलेली ही भूमिका अत्यंत संवेदनशील मानली जात आहे

Web Title: india terrorism afghanistan un