'मोदी सरकार'वर देशातील 73% नागरिकांचा विश्‍वास...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 जुलै 2017

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर देशातील केवळ 30% नागरिकांनी विश्‍वास दर्शविला आहे; तर "ब्रेक्‍झिट'च्या मुद्यामुळे सध्या संवेदनशील देशांतर्गत परिस्थिती अनुभवत असलेल्या ब्रिटनमधील थेरेसा मे सरकारवर देशातील 41% नागरिकांनी विश्‍वास ठेवण्याची तयारी दाखविली आहे

नवी दिल्ली - भारतामध्ये सध्या सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारवर देशातील सुमारे 73% नागरिकांचा विश्‍वास असल्याचे "ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट' (ओईसीडी) या आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वपूर्ण संघटनेच्या पाहणीमध्ये आढळून आले आहे.

भारतामधील सरकारवर दर्शविण्यात आलेल्या विश्‍वासाचे हे प्रमाण जगामधील कोणत्याही देशामधील सरकारवर दाखविण्यात आलेल्या विश्‍वासामध्ये सर्वोच्च आहे. मोदी यांच्यानंतर या पाहणीमध्ये कॅनडाचे तरुण पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी क्रमांक मिळविला आहे. त्रुडो यांच्या सरकारवर कॅनडातील 62% नागरिकांनी विश्‍वास दर्शविला आहे. यानंतर या यादीमध्ये तुर्कस्तानने आश्‍चर्यकारकरित्या तिसरा क्रमांक मिळविला आहे. तुर्कस्तानमध्ये गेल्या वर्षी एर्दोगन यांच्या सरकारविरोधात करण्यात आलेले लष्करी बंड फसले होते. या पार्श्‍वभूमीवर, तुर्कस्तानमधील या सरकारवर देशातील 58% नागरिकांनी विश्‍वास दर्शविला आहे. यानंतर या यादीमध्ये रशिया (58%) व जर्मनी (55%) या देशांनी स्थान मिळविले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर देशातील केवळ 30% नागरिकांनी विश्‍वास दर्शविला आहे; तर "ब्रेक्‍झिट'च्या मुद्यामुळे सध्या संवेदनशील देशांतर्गत परिस्थिती अनुभवत असलेल्या ब्रिटनमधील थेरेसा मे सरकारवर देशातील 41% नागरिकांनी विश्‍वास ठेवण्याची तयारी दाखविली आहे. या यादीच्या तळाशी ग्रीस देशास स्थान देण्यात आले आहे. या देशातील केवळ 13% नागरिकांनी येथील सरकारवर विश्‍वास ठेवण्याची भूमिका व्यक्त केली आहे.

भारतामधील केंद्र सरकारच्या दृष्टिकोनामधून ही बातमी अत्यंत दिलासादायक मानली जात आहे.