अमेरिका भारत लष्करी सहकार्य आणखी वाढणार

पीटीआय
गुरुवार, 26 जानेवारी 2017

या भागामधील अत्यंत महत्त्वपूर्ण देश असलेल्या भारताबरोबरील लष्करी सहकार्य वाढविण्याची अमेरिकेची भूमिका आहे

वॉशिंग्टन - अमेरिका व भारतामधील संरक्षणविषयक सहकार्य हे सध्या परमोच्च पातळीवर असले; तरी काही वेळा प्रशासकीय व्यवस्थेमुळे (ब्युरोक्रसी) द्विपक्षीय सहकार्याचा वेग मंदावतो, असे मत अमेरिकन सैन्यामधील उच्चाधिकारी जनरल रॉबर्ट ब्राऊन यांनी व्यक्त केले आहे. ब्राऊन हे अमेरिकन सैन्याच्या प्रशांत महासागर विभागाचे मुख्याधिकारी आहेत. भारत हा या भागामधील अत्यंत महत्त्वपूर्ण देश असल्याचे निरीक्षण त्यांनी यावेळी बोलताना नोंदविले.

""भारतीय लष्कराबरोबर अमेरिकेचे संबंध कायमच उत्तम राहिले आहेत. मात्र कधी कधी नोकरशाहीमुळे सहकार्याचा हा वेग मंदावतो. आम्ही या अडथळ्यासंदर्भात काम करत आहोत. आता द्विपक्षीय सहकार्याचा हा वेग निश्‍चितच वाढला आहे. या भागामधील अत्यंत महत्त्वपूर्ण देश असलेल्या भारताबरोबरील लष्करी सहकार्य वाढविण्याची अमेरिकेची भूमिका आहे. भारत व अमेरिकेमधील सहकार्य हे आत्तापर्यंत मी पाहिलेल्या द्विपक्षीय सहकार्याचे सर्वोच्च उदाहरण आहे,'' असे ब्राऊन म्हणाले.

भारताचे लष्कर हे अत्यंत शक्तिशाली असून त्यांच्याबरोबर काम करणे ही बहुमानाची गोष्ट असल्याची भावनाही ब्राऊन यांनी यावेळी व्यक्त केली.