टोलमधून दीड लाख कोटी मिळविण्याचे उद्दिष्ट- गडकरी

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

भारतात वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे महामार्गावरील टोलद्वारे मिळणाऱ्या परताव्याचा आकडा चांगला असल्याने या क्षेत्रातील गुंतवणुकीत धोका आता कमी आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 

सिंगापूर- अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने भारतामध्ये 105 नवीन महामार्गांची निर्मिती करून टोलच्या माध्यमातून 1 लाख 45 हजार कोटी रुपयांचा परतावा मिळविण्याचे उद्दिष्ट असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

भारतात वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे महामार्गावरील टोलद्वारे मिळणाऱ्या परताव्याचा आकडा चांगला असल्याने या क्षेत्रातील गुंतवणुकीत धोका आता कमी आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 

दिल्ली येथे भारतीय एकात्मिक वाहतूक परिषद होणार असून, त्यानिमित्त गडकरी यांनी विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एक सादरीकरण केले. त्यावेळी ते बोलत होते. येत्या काळात 1 लाख 45 हजार कोटी रुपये किमतीचे 105 प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

ब्रम्हपुत्रा महामार्गाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ईशान्य भारतात आसाममधील ब्रम्हपुत्रा नदीवर विकसित करण्यात येणारा हा पहिलाच प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पाचा खर्च जवळपास 40 हजार कोटी आहे असेही गडकरी नमूद केले. 

ईशान्य भारतात संपर्काचे साधन असणे गरजेचे आहे व सरकारसाठी ते सर्वात महत्त्वाचे आहे. ईशान्य भारतातील रस्त्यांसाठी आतापर्यंत 40 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि येत्या दोन वर्षांत हा आकडा 1 लाख 50 हजार कोटी रुपये असेल असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले. पुढील तीन वर्षांत 1300 किमी महामार्गाचे काम पूर्ण करणार आहोत व येत्या तीन महिन्यांत त्याबाबतचा संपूर्ण आराखडा तयार होईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.