आम्ही राष्ट्रीय हिताच्या पूर्तीसाठी कचरणार नाही: नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जून 2017

सर्जिकल स्ट्राईक्‍स ज्यांच्यावर करण्यात आला; ते वगळता जगात इतर कोणाकडूनही यासंदर्भात तक्रार करण्यात आली नाही. दहशतवादाविरुद्ध जागतिक मत तयार करण्यासंदर्भात भारताच्या प्रयत्नांस आलेले हे यश आहे

वॉशिंग्टन - भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये विवेक व संयम पाळण्यात आला असला; तरी देशाचे राष्ट्रीय हित साधण्याचे धोरण राबविताना आम्ही कचरणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय-अमेरिकन नागरिकांच्या समुदायासमोर बोलताना स्पष्ट केले.

ही भूमिका अधिक अधोरेखित करताना पंतप्रधानांकडून यावेळी पाकिस्तानचा थेट उल्लेख न करता भारतीय लष्कराकडून घडविण्यात आलेल्या "सर्जिकल स्ट्राईक्‍स'चे उदाहरण देण्यात आले. ""सर्जिकल स्ट्राईक्‍स ज्यांच्यावर करण्यात आला; ते वगळता जगात इतर कोणाकडूनही यासंदर्भात तक्रार करण्यात आली नाही. दहशतवादाविरुद्ध जागतिक मत तयार करण्यासंदर्भात भारताच्या प्रयत्नांस आलेले हे यश आहे,'' असे मोदी म्हणाले.

या कार्यक्रमावेळी नागरिकांकडून "भारतमाता की जय' अशा घोषणा देण्यात आल्या. अमेरिकेमधील भारतीयांच्या पिढीलाही भारताविषयी अशाच प्रकारची आत्मीयता वाटावी, याची काळजी घ्या, असे आवाहन पंतप्रधानांकडून यावेळी करण्यात आले. मोदी लवकरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत.