भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला 40 लाख सिंगापुरी डॉलर भरपाई 

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

रमेश कृष्णन (वय 47) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. "ऍक्‍सा' कंपनीने 2012मध्ये आपल्या कामगिरीबाबत दिलेल्या शिफारसपत्रातील विधानांमुळे आपली बदनामी झाल्याचा आरोप कृष्णन यांनी केला होता, असे "द स्ट्रेट्‌स टाइम्स' वर्तमानपत्रातील बातमीत म्हटले आहे.

सिंगापूर : जुन्या कंपनीने दिलेल्या शिफारसपत्रातील अनुचित मजकुरामुळे सिंगापूरमधील भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला नव्या कंपनीत नोकरी मिळू शकली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्याला तब्बल 40 लाख सिंगापुरी डॉलर एवढी प्रचंड भरपाई "ऍक्‍सा' (एएक्‍सए) कंपनीकडून मिळाली आहे. 

रमेश कृष्णन (वय 47) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. "ऍक्‍सा' कंपनीने 2012मध्ये आपल्या कामगिरीबाबत दिलेल्या शिफारसपत्रातील विधानांमुळे आपली बदनामी झाल्याचा आरोप कृष्णन यांनी केला होता, असे "द स्ट्रेट्‌स टाइम्स' वर्तमानपत्रातील बातमीत म्हटले आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात 2015मध्ये त्यांना हार पत्करावी लागली. परंतु "ऍक्‍सा'ने कृष्णन यांची काळजी घेण्यात कसूर केली, असा निर्णय नंतर अपीलीय न्यायालयाने दिला. 

कृष्णन यांच्या विनंतीनुसार "ऍक्‍सा'ने दिलेल्या शिफारसपत्रात म्हटले होते, "त्यांचा 13 व्या महिन्यातील सातत्याचा दर अत्यंत निकृष्ट दर्जाचा आढळतो. त्यामुळे कंपनीच्या ग्राहकांना योग्य सल्ला मिळत असावा का, याबाबत आम्हाला चिंता वाटते.' त्यावरून कृष्णन सक्षम नसल्याचा चुकीचा समज होऊ शकतो. त्यांचा अंतर्भाव "ऍक्‍सा'च्या सर्वोत्तम वित्तीय सेवा संचालकांत केला जात असे. त्यामुळे काही काळापूर्वी कंपनीनेच त्यांना राजीनामा देण्यापासून परावृत्त केले होते. या पार्श्‍वभूमीवर शिफारसपत्रातील शेरा वस्तुनिष्ठ वाटत नाही, असे अपीलीय न्यायालयाने म्हटले आहे. 
 

टॅग्स