शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना डॅन डेव्हिड पुरस्कार जाहीर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 मे 2017

भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तीन श्रेणीत डॅन डेव्हिड पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार विज्ञान, मानवता आणि नागरी समाजात आपल्या कार्याच्या माध्यमातून अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला दिला जातो

तेल अवीव - भारतीय शास्त्रज्ञ, महाराष्ट्राचे भूमिपुत्र श्रीनिवास कुलकर्णी यांची अंतराळ विज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी नामांकित डॅन डेव्हिड पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. दहा लाख डॉलर असे या पुरस्काराचे स्वरूप असून तेल अवीव विद्यापीठातील डॅन डेव्हिड फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. कुलकर्णी यांच्याअगोदर तीन भारतीयांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यात लेखक अमिताव घोष, संगीतकार जुबिन मेहता आणि रसायनशास्त्रज्ञ सीएनआर राव यांचा समावेश आहे.

श्रीनिवास कुलकर्णी हे पासाडिना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीत खगोलभौतिकीचे प्रोफेसर आहेत. पॅलोमर ट्रॅन्शेंट फॅक्‍टरीचे संस्थापक आणि संचालक म्हणून ते ओळखले जातात. अवकाशात रात्रीच्या वेळी होणाऱ्या बदलाच्या सिद्धांताचा शोध घेण्यासाठी श्रीनिवास कुलकर्णी यांनी केलेल्या सर्व्हेक्षणाची जगाने दखल घेतली. यातून आकाशातील क्षणिक घटनांची विस्ताराने मिळण्यास मदत झाली. हा पुरस्कार येत्या 21 मे रोजी प्रदान करण्यात येणार आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तीन श्रेणीत डॅन डेव्हिड पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार विज्ञान, मानवता आणि नागरी समाजात आपल्या कार्याच्या माध्यमातून अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला दिला जातो.