अमेरिकेत "जिहादी युद्धा'चे कारस्थान;भारतीय आढळला दोषी

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जुलै 2017

मोहम्मद याने अमेरिकेच्या सैन्याधिकाऱ्यांसहित टोलेडो येथील एका न्यायाधीशाचे प्राण घेण्यासाठी रचण्यात आलेल्या कारस्थानात भाग घेतला. तो एक धोकादायक गुन्हेगार असून त्याला दीर्घ कारावासाची शिक्षा होणे न्याय्य आहे

वॉशिंग्टन - अमेरिकेविरोधात "हिंसक जिहादी युद्ध' सुर करण्यासाठी अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेस आर्थिक पाठबळ पुरविण्यासंदर्भातील खटल्यामध्ये याह्या फारुक मोहम्मद (वय 39) हा भारतीय दोषी आढळला आहे.

भारतीय नागरिक असलेल्या मोहम्मद याने 2008 मध्ये एका अमेरिकेचे नागरिकत्व असलेल्या महिलेशी विवाह केला होता. या प्रकरणी मोहम्मद याला 27 वर्षांच्या कारवासासह हद्दपारीची (डिपोर्टेशन) शिक्षा होऊ शकते.

मोहम्मद याने 2002 ते 2004 या काळात ओहिओ विद्यापीठामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. मोहम्मद याच्यासहित इब्राहिम मोहम्मद हा त्याचा भाऊ, असिफ अहमद सलीम व सुलतान रुम सलीम (दोघे भाऊ) यांच्यावर यासंदर्भात सप्टेंबर 2015 मध्ये खटला भरण्यात आला होता. या तिघांविरोधातील सुनावणी अद्यापी पूर्ण व्हावयाची आहे.

"मोहम्मद याने अमेरिकेच्या सैन्याधिकाऱ्यांसहित टोलेडो येथील एका न्यायाधीशाचे प्राण घेण्यासाठी रचण्यात आलेल्या कारस्थानात भाग घेतला. तो एक धोकादायक गुन्हेगार असून त्याला दीर्घ कारावासाची शिक्षा होणे न्याय्य आहे,'' असे मत या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायाधीश डेव्हिड सिरलेजा यांनी या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केले.