द. चिनी समुद्र: आता इंडोनेशियाचे चीनला थेट आव्हान...

वृत्तसंस्था
रविवार, 16 जुलै 2017

या नव्या व्यवस्थेन्वये आंतरराष्ट्रीय समुदायास दक्षिण चिनी समुद्रामधील जहाजे कोणत्या देशाच्या सागरी सीमेमधून जात आहेत, याची कल्पना येईल

जकार्ता - इंडोनेशियाने दक्षिण चिनी समुद्राच्या इंडोनेशियन विशेष आर्थिक क्षेत्रांतर्गत (एक्‍सक्‍ल्युझिव्ह इकॉनॉमिक झोन) येणाऱ्या भागाचे वेगळे नामकरण करण्याच्चा संवेदनशील निर्णय घेतला आहे. दक्षिण चिनी समुद्राच्या 90% पेक्षाही जास्त भागावर चीनने दावा सांगितल्याने दक्षिण पूर्व आशियातील इंडोनेशियासहित इतर देश व चीनमध्ये या मुद्यावरुन तणावपूर्ण संबंध आहेत. या पार्श्‍वभूमीवर इंडोनेशियाने चिनी दबावापुढे न झुकता इंडोनेशियाच्या आर्थिक क्षेत्रात येणाऱ्या भागाचे नाव "नॉर्थ नाटुना सी' असे ठेवल्याचे घोषित केले आहे.

इंडोनेशियाच्या सागरी मंत्रालयाचे उपमंत्री अरिफ हवस यांनी नव्या "नकाशां'सहित या नव्या नावाची घोषणा एका पत्रकार परिषदेद्वारे केली. "या नव्या व्यवस्थेन्वये आंतरराष्ट्रीय समुदायास दक्षिण चिनी समुद्रामधील जहाजे कोणत्या देशाच्या सागरी सीमेमधून जात आहेत, याची कल्पना येईल,' असे हवस यांनी स्पष्ट केले.

इंडोनेशियाची ही नवी भूमिका चिनी वर्चस्ववादास थेट आव्हान असल्याचे मानले जात आहे. इंडोनेशियाने केलेली ही सागरी सीमांची आखणी अर्थातच चिनी दाव्यांतर्गत येत असल्याने चीनकडून यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त करण्यात आली आहे.

इंडोनेशियाप्रमाणेच फीलिपीन्सकडूनही 2011 मध्ये दक्षिण चिनी समुद्राच्या काही भागाचे नामकरण "वेस्ट फीलिपीन सी' असे नामकरण करण्यात आले होते. 2016 मध्ये या प्रकरणी झालेल्या सुनावणीमध्ये आंतरराष्ट्रीय लवादानेही चिनी दाव्यास काहीही कायदेशीर पाया नसल्याचे सांगत चीनला चपराक लगावली होती.

टॅग्स