.. म्हणून 'सर्जिकल स्ट्राईक'विषयी आधी पाकिस्तानला सांगितले : पंतप्रधान मोदी 

Narendra Modi
Narendra Modi

लंडन : 'आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला.. त्यानंतर पाकिस्तानच्या सरकारशी संपर्क साधण्याचे सतत प्रयत्न केले.. जेणेकरून त्यांना या कारवाईची माहिती देता येऊ शकेल आणि जमल्यास त्यांच्या दहशतवाद्यांचे मृतदेह त्यांना तेथून उचलता येऊ शकतील.. पण 'ते' आमचा फोन उचलायला घाबरत होते..' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराच्या 'सर्जिकल स्ट्राईक'विषयीचे एक गुपीत जाहीर केले. ब्रिटनच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी काल (बुधवार) रात्री 'भारत की बात, सबके साथ' या कार्यक्रमामध्ये ही माहिती दिली. 

या कार्यक्रमामध्ये कवी प्रसून जोशी यांनी पंतप्रधान मोदी यांची मुलाखत घेतली. 'भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकविषयीची माहिती सर्वांसाठी जाहीर करण्यापूर्वी पाकिस्तानला या कारवाईची माहिती देण्याची गरज होती. त्यामुळे आम्ही त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो', असे मोदी यांनी या मुलाखतीत सांगितले. ते म्हणाले, "भारतीय जनतेला ही माहिती देण्यापूर्वी पाकिस्तानला याविषयी सांगावे, असे आम्ही ठरविले होते. जेणेकरून त्या दहशतवाद्यांचे मृतदेह ते उचलून नेऊ शकतील. त्या दिवशी आम्ही त्यांना सकाळी अकरापासून फोन करत होतो. पण त्यांना बहुदा भारताचा फोन घेण्यास भीती वाटत असावी. अखेर दुपारी बारा वाजता त्यांच्याशी संपर्क झाला. त्यानंतर आम्ही भारतीय प्रसिद्धीमाध्यमांना ही बातमी दिली.'' अत्यंत कौशल्याने भारतीय लष्कराने ही कामगिरी पार पाडली आणि उजाडण्यापूर्वी सर्वजण भारतात परतले, याविषयी पंतप्रधान मोदी यांनी लष्कराचे कौतुक केले. 

आम्हाला शांतताच हवी आहे; पण.. 
"आम्हाला शांतता हवी आहे. पण जे देश दहशतवादाची निर्यात करतात, त्यांच्याविषयी आम्ही सहानुभूतीचे धोरण ठेवणार नाही. त्यांना समजेल, अशा भाषेत आम्ही ठोस प्रत्युत्तर देणारच! जेव्हा एखादा देश त्यांच्या भूमीत दहशतवाद्यांना आश्रय देतो.. माझ्या देशावर, जनतेवर हल्ले करतो.. आणि ज्या देशाकडे समोरासमोर युद्ध करण्याची हिंमत नाही.. तेव्हा त्या देशाला त्यांच्याच भाषेत उत्तर कसे द्यायचे, हे मला चांगलेच ठाऊक आहे'', असे विधान पंतप्रधान मोदी यांनी केले आणि कार्यक्रमास उपस्थित भारतीयांनी 'भारत माता की जय'चा एकच जयघोष केला. 

गुजरातमधील त्या रेल्वे स्थानकावर चहा विकणारा मुलगा 'नरेंद्र मोदी' होता.. आता लंडनमधील रॉयल पॅलेसमध्ये असलेला माणूस म्हणजे 125 कोटी भारतीयांचा सेवक आहे. लोकशाहीमध्ये जनता देवासमान असते. त्यांची इच्छा असेल, तर चहावालाही पंतप्रधान होऊ शकतो आणि रॉयल पॅलेसमध्ये (राजघराण्यातील व्यक्तींशी) चर्चा करू शकतो. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com