कुलभूषण जाधव प्रकरणी भारत-पाकने मांडली बाजू

वृत्तसंस्था
सोमवार, 15 मे 2017

 भारत आणि पाकिस्तान सुमारे 18 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकमेकांसमोर पुन्हा एकदा आज उभे राहत आहेत. याआधी 1999 मध्ये पाकिस्तानी नौदलाचे विमान पाडल्याप्रकरणी भारताला आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानने खेचले होते...

हेग - भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने एकतर्फी सुनाविलेल्या फाशीसंदर्भात सुनावणी करत असलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आज (सोमवार) दिवसभरात भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांची बाजू ऐकून घेतली. या प्रकरणासंदर्भातील निकालाची तारीख न्यायालयाकडून नंतर जाहीर केली जाणार आहे.

कुलभूषण जाधव प्रकरणी भारताची भूमिका -
- जाधव यांना इराणमधून पाकिस्तानात पळवून आणून खटला चालविला.
- जाधव यांच्याविरोधात सुनावणीचा फार्स, वकील न देऊन पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने न्यायप्रक्रियेचा अनादर केला आहे
- खोट्या आरोपांखाली पाकिस्तानमध्ये गेल्या एक वर्षापासून अधिक काळ अटकेत असलेल्या निरपराध भारतीय नागरिकाला व्हिएन्ना करारानुसार दिले जाणारे कोणतेही अधिकार आणि संरक्षण दिले गेले नाही. संपर्काचाही अधिकार हिरावून घेतला. त्यांना दिलेली फाशीची शिक्षाही "कधीही' अंमलात आणली जाऊ शकते.
- जाधव यांना वकील देण्याची भारताची विनंती पाकिस्तानने वारंवार फेटाळली आणि सुनावणीची कागदपत्रेही भारताकडे सोपविली नाहीत.
- मूलभूत मानवी अधिकारांचीही पाकिस्तानकडून पायमल्ली
- पाकिस्तान लष्कराच्या तुरुंगात असताना जाधव यांच्याकडून बळजबरीने जबाब नोंदवून त्या आधारावर आरोप ठेवण्यात आले.
- आंतरराष्ट्रीय न्यायालयाद्वारे निकाल जाहीर होण्यापूर्वीच जाधव यांना फाशी दिली जाण्याची भारताला भीती.
- अनेकवेळा विनंती करूनही पाकिस्तान सरकारने जाधव यांच्याविरोधातील आरोपपत्र, पुरावे सादर केलेले नाहीत.
- अखेरच्या क्षणापर्यंत जाधव यांना वकील पुरविण्यात आलेला नाही. जाधव यांना फाशी दिल्यास पाकिस्ताला युद्धगुन्हेगारीचा आरोप ठेवावा लागेल.
- जाधव यांच्या कुटुंबीयांनी केलेला व्हिसाचा अर्ज पाकिस्ताकडे अद्यापही प्रलंबित.

कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानची भूमिका -
- जाधव यांना सुनाविण्यात आलेली शिक्षा हा मुद्दा पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेशी निगडीत आहे. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय न्यायालय यात हस्तक्षेप करू शकत नाही
- जाधव यांनी आपल्याला भारतानेच निष्पाप पाकिस्तानींची कत्तल करण्यासाठी पाठवले अशी कबुली दिल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानची बाजू खाबर कुरैशी यांनी मांडली. भारत आणि पाकिस्तान सुमारे 18 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकमेकांसमोर पुन्हा एकदा आज (सोमवारी) उभे राहत आहेत. याआधी 1999 मध्ये पाकिस्तानी नौदलाचे विमान पाडल्याप्रकरणी भारताला आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानने खेचले होते.
 

Web Title: International Court hears both the sides