इराणमध्ये 'इसिस'चे आत्मघाती हल्ले

पीटीआय
गुरुवार, 8 जून 2017

तेहरान - इराणची राजधानी तेहरानमधील दोन अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांवर आज इसिसकडून करण्यात आलेल्या दोन मोठ्या हल्ल्यांत 12 जण मृत्युमुखी पडले असून 42 जण जखमी झाले. तेहरानमधील संसदेच्या इमारतीवर आणि इराणचे क्रांतिकारी नेते व संस्थापक आयातुल्ला खोमेनी यांच्या कबरीवर हे हल्ले करण्यात आले. या दोन्ही आत्मघाती हल्ल्यांची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. संसदेत चार आणि कबरीजवळ दोन अशा सहा हल्लेखोरांना ठार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

इसिसच्या आत्मघाती हल्लेखोरांनी तेहरान शहराच्या मध्यवर्ती भागातील इराणच्या संसदेच्या इमारतीत प्रवेश करून बेछूट गोळीबार केला. एकूण चार हल्लेखोरांनी संसदेवर हल्ला केला होता, असे सांगण्यात आले. एका हल्लेखोराने संसदेच्या इमारतीच्या बाहेर येऊन रस्त्यांवरील नागरिकांवरही गोळीबार केल्याचे स्थानिक वृत्तसंस्थेने म्हटले आहे. हा गोळीबार बराच काळ सुरू होता, तसेच संसदेच्या इमारतीमध्ये अनेक जण अडकून पडले होते. हल्लेखोरांनी महिलांचा वेश परिधान केला होता.

संसदेच्या इमारतीमध्ये सुरक्षा दलांनी हल्लेखोरांचा प्रतिकार केला. संसदेच्या इमारतीला सुरक्षा दलांनी वेढा दिला होता. एका हल्लेखोराने संसदेच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर स्वतःला बॉंबने उडवून दिले. सुरक्षा दलांच्या सैनिकांनी संसदेच्या इमारतीमध्ये गोळीबार करणाऱ्या एकूण चार हल्लेखोरांना ठार केले, असे सांगण्यात आले. हल्ला झाला तेव्हा संसदेच्या सभागृहाचे कामकाज सुरू होते. संसदेत चार हल्लेखोरांना ठार करण्यात आले. संसदेच्या इमारतीपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर इराणचे संस्थापक आयातुल्ला खोमेनी यांची कबर आहे. या कबरीच्या आवारात दोन हल्लेखोरांनी प्रवेश केला होता. कबरीच्या पश्‍चिम प्रवेशद्वारावर एका हल्लेखोराने स्वतःला उडवून देत बॉंबस्फोट घडवून आणला, तर दुसऱ्या हल्लेखोराने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.

इसिसचा पहिला मोठा हल्ला
इसिसकडून करण्यात आलेला दावा जर खरा मानला तर हा इराणच्या भूमीवरील इसिसचा पहिला मोठा हल्ला आहे. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इराणकडून सौदी अरेबियाकडेही संशयाने पाहिले जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताज्या भेटीनंतर सौदी अरेबिया आक्रमक झाल्याचे मानले जाते. इराणमध्ये इसिसचा संबंध सौदीशी जोडला जातो. सौदी अरेबिया इसिसला तात्त्विक, आर्थिक मदतीसह प्रत्यक्ष रसद पुरविली जाते, असा घणाघाती आरोप इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचे निकटवर्तीय हमीदरेझा तराघी यांनी केला आहे.