श्रीलंकेत पूरबळींची संख्या शंभरच्या पुढे 

वृत्तसंस्था
शनिवार, 27 मे 2017

पुराचा तडाखा बसलेल्या श्रीलंकेला भारताकडून मदत पाठविण्यात आली आहे. भारताने नौदलाची तीन जहाजे मदत साहित्यासह कोलंबोकडे रवाना झाली असून, त्या पैकी एका जहाज शनिवारी सकाळी श्रीलंकेत दाखल झाले, तर भारतीय नौदलाची दोन जहाजे उद्या श्रीलंकेत पोचतील असे सांगण्यात आले.

कोलंबो : श्रीलंकेतील पूरबळींची संख्या शंभरच्या पुढे गेली असून, इतर 99 जण बेपत्ता असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. पूरस्थितीने गंभीर रूप घेतलेले असताना जोरदार पावसाचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त राष्ट्रे (यूएन), आंतरराष्ट्रीय शोध व बचाव गट आणि शेजारी देशांना मदत पाठविण्याचे आवाहन केले आहे. 

आपत्ती व्यवस्थापन विभागाने धोक्‍याचा इशारा दिल्यानंतर अनेक भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. पुढील काही काळात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. पूरबळींचा आकडा शंभरच्या पुढे गेला असून, 99 जण बेपत्ता असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. मात्र, नेमके किती जण मृत्युमुखी पडले, याची माहिती देण्यात आलेली नाही. मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. श्रीलंकेतील 2003 नंतरचा हा सर्वांत भीषण पूर आहे. 

भारताचे जहाज कोलंबोत दाखल 
नवी दिल्ली : पुराचा तडाखा बसलेल्या श्रीलंकेला भारताकडून मदत पाठविण्यात आली आहे. भारताने नौदलाची तीन जहाजे मदत साहित्यासह कोलंबोकडे रवाना झाली असून, त्या पैकी एका जहाज शनिवारी सकाळी श्रीलंकेत दाखल झाले, तर भारतीय नौदलाची दोन जहाजे उद्या श्रीलंकेत पोचतील असे सांगण्यात आले.

भारताने त्वरित पाठवलेल्या मदतीबद्दल श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आभार व्यक्त केले आहेत.  दरम्यान, पुराच्या आपत्तीचा सामना करत असलेल्या श्रीलंकेतील नागरिकांना भारताकडून मदत पाठवली जाईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदी यांनी 'ट्‌विटर'च्या माध्यमातून पुरामध्ये बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली.