विनाशकारी भूकंपामुळे मोठे नुकसान

वृत्तसंस्था
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

इराक आणि इराणमध्ये झालेल्या भूकंपामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.
- नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान

तेहरान: इराक आणि इराणच्या दरम्यान असलेल्या सीमावर्ती भागाला रविवारी रात्री बसलेल्या 7.3 रिश्‍टर तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्‍क्‍यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली आहे. इराणमधील सरपोल-ए-झहाब शहरात भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झाले असल्याचे वृत्त आहे.

भूकंपाच्या धक्‍क्‍यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. इराणी वृत्तसंस्था आणि सोशल मीडियामधून प्रसारित करण्यात आलेल्या अनेक व्हिडिओमध्ये भूकंपाच्या धक्‍क्‍यानंतर नागरिक भीतीने घराबाहेर पडताना दिसून येत आहेत. या भूकंपामुळे इराक आणि इराण यांच्यामध्ये असलेल्या झाग्रोस पर्वतांमधील केरमानशाह प्रांतातील सरपोल-ए-झहाब शहराचे मोठे नुकसान झाले आहे. भूकंपामुळे अनेक ठिकाणी इमारती कोसळल्या. त्यामुळे अनेक जण बेघर झाले आहेत. सरपोल-ए-झहाब शहराचा पाणी व वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. मोबाईल आणि दूरध्वनीसेवाही ठप्प झाली असल्याचे सांगण्यात आले.
""या भूकंपाची तीव्रता 7.3 रिश्‍टर स्केल होती आणि केंद्रबिंदू इराकमधील हालाब्जा शहरापासून 31 किलोमीटर अंतरावर, जमिनीत 23.2 किलोमीटर खोलीवर होता,'' असे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले. सामान्यपणे सात रिश्‍टर स्केल तीव्रतेचा भूकंप विनाशकारी मानला जातो.

इराक-इराण सीमाभाग हादरला
- भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 350 वर
- ग्रामीण व डोंगराळ भागामुळे मदतकार्यात अडचणी
- भूमध्यसागराच्या किनारी भागातही जाणवले धक्के
- इराणमधील केरमानशाह प्रांताला मोठा तडाखा
- इराकमधील कुर्दीश प्रांताला हादरे
- इमारती कोसळल्यामुळे अनेक जण बेघर
- इराकी राजधानी बगदादमध्येही जाणवले धक्के

Web Title: iran news iran iraq earthquake