इराणला अण्वस्त्रसज्ज बनु देणार नाही: ट्रम्प

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

आम्ही इराणवर याआधीच नवे आर्थिक निर्बंध लादले आहेत. इराणला अण्वस्त्र बनविण्यात यश येऊ नये, यासाठी आम्ही आणखी प्रयत्न करु

वॉशिंग्टन - इराणबरोबर झालेला आण्विक करार हा अमेरिकेने आत्तापर्यंत केलेला सर्वांत वाईट करार असल्याचे मत व्यक्त करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "इराणला अण्वस्त्र तयार करण्यात कधीही यश येणार नाही,' असे आश्‍वासन इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना दिले आहे.

नेतान्याहू हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे याआधीचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे इस्राईलसंदर्भातील धोरण वादग्रस्त ठरले होते. नेतान्याहू यांनी ओबामांच्या धोरणाबद्दल नापसंतीही व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर, ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना दिलेले हे आश्‍वासन अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.

"इस्राईलसमोर असलेली सुरक्षाविषयक आव्हाने प्रचंड आहेत. या आव्हानांमध्ये इराणच्या आण्विक महत्वाकांक्षेचाही अर्थात समावेश आहे. इराणविषयक करार हा मी आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्वांत वाईट करारांपैकी एक आहे. आम्ही इराणवर याआधीच नवे आर्थिक निर्बंध लादले आहेत. इराणला अण्वस्त्र बनविण्यात यश येऊ नये, यासाठी आम्ही आणखी प्रयत्न करु,'' असे ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना आश्‍वस्त करत म्हटले आहे.

याचबरोबर, "इस्राईलला असलेल्या अनेक धोक्‍यांपासून बचाव करत सुरक्षित राहता यावे या उद्देशार्थ अमेरिकेकडून या देशास सध्या याआधी कधी नव्हते इतक्‍या प्रमाणात सुरक्षा सहाय्य केले जात असल्याचेही,' अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.