मोसूलच्या पूर्व भागावर इराकी लष्कराचा ताबा

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

बगदाद : मोसूल शहराच्या पूर्व भागावर ताबा मिळविला असल्याची माहिती इराकच्या लष्कराने आज दिली. मोसूल ताब्यात घेण्यासाठी इसिसबरोबर सुरू असलेल्या संघर्षात आंतरराष्ट्रीय फौजांचा पाठिंबा असलेल्या इराकच्या लष्कराचा हा मोठा विजय मानला जातो.

इराकच्या लष्कराचे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख असलेल्या तालीब शघाती यांनी पत्रकारांना सांगितले, की तिग्रीस नदीच्या पूर्वेकडील संपूर्ण भागावर इराकी लष्कराने ताबा मिळविला आहे. या भागातून इसिसची पीछेहाट झाली आहे. मोसूलमधून वाहणाऱ्या तिग्रीस नदीमुळे शहराचे दोन भाग झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा असलेल्या इराकी लष्कराने मागील महिन्यांत इसिसच्या विरोधात मोठी आघाडी उघडली होती. त्यानंतर मोसूलचा पूर्व भाग ताब्यात घेतला असल्याचे सांगण्यात आले. मोसूल हे इराकमधील दुसरे सर्वांत मोठे शहर आहे. मागील शुक्रवारी मोसूल विद्यापीठाच्या इमारतीवर इराकी लष्कराने ताबा मिळविला होता. मोसूल विद्यापीठाच्या इमारतीचा इसिसकडून लष्करी तळासारखा उपयोग केला जात होता.

मागील वर्षी ऑक्‍टोबरपासून इसिसच्या विरोधात संघर्ष सुरू आहे. सुरवातीला इसिसकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले होते; मात्र त्यानंतर इसिसची पीछेहाट सुरू झाली आहे.