इसिस हारली; मरा अन् स्वर्गात 72 बायका मिळवा

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

अरबी सदस्य सोडून इतरांनी त्यांच्या देशांमध्ये परत जावे अथवा स्वतःला बाँबने उडवून द्यावे असा आदेशही बगदादी याने दिला असल्याचे वृत्त आहे. 'त्यांना स्वर्गात 72 बायका मिळतील,' असे वचनही बगदादीने दिले आहे. 

कैरो : आपल्या गटाचा इराकमध्ये पराभव झाला असल्याचे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लिव्हँट तथा इसिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू बक्र अल-बगदादी याने 'निरोपाच्या भाषणात' कबुल केले आहे. 

इसिससाठी युद्ध कारवाया करणारे अरबी सदस्य सोडून इतरांनी त्यांच्या देशांमध्ये परत जावे अथवा स्वतःला बाँबने उडवून द्यावे असा आदेशही बगदादी याने दिला असल्याचे वृत्त आहे. 'त्यांना स्वर्गात 72 महिला मिळतील,' असे वचनही बगदादीने दिले आहे. 

बगदादीने स्वतःला जगातील मुस्लिमांचा नेता म्हणजे खलिफा घोषित केले होते. त्याने 'निरोपाचे भाषण' म्हणून एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. हे निवेदन इसिसच्या सर्व मुल्ला-मौलवींमध्ये काल वितरीत करण्यात आले आहे. 

इसिसच्या ताब्यात असलेला शेवटचा प्रांत म्हणजे मोसुल येथेही इराकी लष्कराने त्यांच्या नाड्या आवळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पराभवाची कबुली देऊन बगदादी काढता पाय घेत असल्याचे 'अल-अरेबिया' या वृत्तसंस्थेने 'अलसुमारिया' या इराकी वृत्तवाहिनीच्या हवाल्याने म्हटले आहे. 

इसिसच्या इराकमधील शाखेच्या कार्यालयातून येथील युद्ध कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवले जाते. हे कार्यालय बंद करा आणि मायदेशी परत जा अथवा बाँबने स्वतः उडवून द्या, असे आदेश बगदादीने दिले असल्याची माहिती इराकमधील सरकारी सूत्रांनी दिली आहे.