'इसिस'चा प्रमुख अबू बक्र अल बगदादी ठार 

वृत्तसंस्था
बुधवार, 12 जुलै 2017

सीरियातील दायर इझॉर प्रांतात काही महिन्यांपूर्वी बगदादीचे अस्तित्व दिसून आले होते; मात्र त्यानंतर त्याचा मृत्यू नेमका कुठे झाला याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे रेहमान यांनी स्पष्ट केले.

बैरुत : "इसिस' या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू बक्र अल बगदादी हा ठार झाल्याचा दावा सीरियामधील मानवाधिकार संघटनेने केला आहे.

बगदादी ठार झाल्याची माहिती "इसिस'मधील इतर म्होरक्‍यांकडूनच समजली असून तो कधी आणि कोठे मेला, याबाबत निश्‍चित माहिती नाही, असे या संघटनेने सांगितले. काही दिवसांपूर्वी बगदादी मारला गेल्याचे वृत्त आले होते, मात्र "इसिस'ने अथवा इतर कोणीही त्याबाबत खात्रीपूर्वक माहिती दिली नव्हती. बगदादीच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचे "इसिस'च्या एका वरिष्ठ कमांडरकडून समजले असल्याचे मानवाधिकार संघटनेचे प्रमुख रामी अब्देल रेहमान यांनी "एएफपी'शी बोलताना सांगितले. 

सीरियातील दायर इझॉर प्रांतात काही महिन्यांपूर्वी बगदादीचे अस्तित्व दिसून आले होते; मात्र त्यानंतर त्याचा मृत्यू नेमका कुठे झाला याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे रेहमान यांनी स्पष्ट केले. बगदादीच्या मृत्यूबद्दल आम्हाला आज (ता. 11) माहिती मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. "इसिस'कडून बगदादीच्या मृत्यूबद्दल अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. 

बगदादीच्या मृत्यूबद्दल मानवाधिकार संस्थेकडून मिळालेल्या माहितीबाबत अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीकडून तटस्थ प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. या माहितीला आम्ही दुजोरा देऊ शकत नाही; मात्र ही माहिती खरी असावी, अशी आशा करतो, असे आघाडीने म्हटले आहे. रशियाच्या हवाई हल्ल्यात बगदादी ठार झाल्याचा दावा रशियाकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. अमेरिकेने त्यास दुजोरा दिलेला नाही.