इस्राईलचे अध्यक्ष लवकरच भारतात

पीटीआय
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

सुरक्षा, शिक्षण, ऊर्जा क्षेत्रांत सहकार्य वाढविणार
जेरुसलेम - इस्राईलचे अध्यक्ष रोवेन रिव्हलीन हे या महिन्याच्या मध्याला सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. या वेळी त्यांच्याबरोबर वरिष्ठ मंत्री, अधिकारी आणि व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ असेल.

सुरक्षा, शिक्षण, ऊर्जा क्षेत्रांत सहकार्य वाढविणार
जेरुसलेम - इस्राईलचे अध्यक्ष रोवेन रिव्हलीन हे या महिन्याच्या मध्याला सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. या वेळी त्यांच्याबरोबर वरिष्ठ मंत्री, अधिकारी आणि व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ असेल.

भारत आणि इस्राईलदरम्यान सुरक्षा, शिक्षण, सायबर, ऊर्जा, जल आणि शेती या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्याचे रिव्हलीन यांच्या दौऱ्याचे उद्दिष्ट आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिव्हलीन हे आपल्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची प्रामुख्याने भेट घेतील. 1992 मध्ये दोन देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यापासून भारताला भेट देणारे रिव्हलीन हे केवळ दुसरे इस्राईली अध्यक्ष असतील. 1996-97 मध्ये इस्राईलचे माजी अध्यक्ष एझर वाइजमन यांनी भारत दौरा केला होता.
राष्ट्रपती मुखर्जी यांच्या गेल्या वर्षीच्या इस्राईल दौऱ्यानंतर दोन देशांमधील "जवळपास संपुष्टात आलेल्या संबंधांना' उजाळा मिळाला होता. या दौऱ्यातच पुन्हा एकदा सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आगामी भारत दौऱ्याबाबत अतिशय उत्सुक असल्याचे सांगत रिव्हलीन यांनी भारताबरोबरील सहकार्याची केवळ ही सुरवात नसून शेती, जल, ऊर्जा, सायबर आणि सुरक्षेच्या सर्व बाबींसाठी आम्ही एकत्र येणार आहोत,' असे म्हटले आहे. रिव्हलीन यांच्या या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदीही इस्राईलला जाण्याची शक्‍यता असून, असे झाल्यास ते या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरतील. भारत आणि इस्राईलमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्यास पुढील वर्षी 25 वर्षे पूर्ण होत असल्याने त्या काळातच मोदी आपला दौरा आखण्याची शक्‍यता आहे. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत.