'जैशे महंमद', "लष्करे'चा आशियाई उपखंडाला धोका ; अमेरिकेचा दावा

'जैशे महंमद', "लष्करे'चा आशियाई उपखंडाला धोका ; अमेरिकेचा दावा

वॉशिंग्टन : "जैशे महंमद' आणि "लष्करे तैयबा' या दहशतवादी संघटनांचा आशियाई उपखंडाला असलेला धोका अद्याप कायम असून, मागील वर्षी आम्ही व्यक्त केलेल्या चिंतेवर पाकिस्तानने योग्य कारवाई केली नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी संघटनांचे अस्तित्व अद्याप कायम असून, मागील वर्षभरात 59 टक्के दहशतवादी हल्ले हे पाच आशियाई देशांमध्ये झाले असून, यामध्ये भारत आणि पाकिस्तानचा समावेश असल्याचे अमेरिकेच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. याच क्रमवारीतील अन्य तीन देशांमध्ये अफगाणिस्तान, इराक आणि फिलिपीन्स यांचा समावेश होता. मागील वर्षभरात जगभरातील दहशतवादी हल्ल्यांची संख्या 23 टक्‍क्‍यांनी घटली असून, या हल्ल्यांमुळे होणारे मृत्यूदेखील 27 टक्‍क्‍यांनी घटल्याचे हा अहवाल सांगतो. 

इराकमधील दहशतवादी हल्ल्यांची संख्या घटल्याने या हिंसाचारात लक्षणीयरीत्या घट झाल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील दहशतवादासंबंधातील प्रवक्ते नॅथन सेल्स यांनी म्हटले आहे. मागील वर्षभरात झालेले शंभर हल्ले हे भौगोलिकदृष्ट्या केंद्रित स्वरूपातील आहेत. मुख्य पाच देशांतील हल्ल्यांचे प्रमाण 59 टक्के एवढे असून, यामध्ये अफगाणिस्तान, भारत, इराक, पाकिस्तान आणि फिलिपीन्स यांचा समावेश आहे. दहशतवाद्यांच्या हिंसाचारामुळे झालेले 70 टक्के मृत्यू हे अन्य पाच देशांतील असून, यामध्ये अफगाणिस्तान, इराक, नायजेरिया, सोमालिया आणि सीरिया यांचा समावेश आहे. 

मित्रराष्ट्रांचा उल्लेख

परराष्ट्र विभागाच्या दहशतवादविषयक अहवालामध्ये अमेरिका आणि मित्रराष्ट्रांच्या मोहिमांचा उल्लेख करण्यात आला असून, या सर्वांना पराभूत करण्यात यश आल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. जगभरातील मित्रराष्ट्रांना सोबत घेऊन आमची वाटचाल सुरू आहे. माहितीचे हस्तांतरण, विमानवाहतूक सुरक्षेतील सुधारणा, कायद्याची काटेकोर अंमलबजावणी आणि दहशतवादी कट्टरतेला रोखण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सेल्स यांनी नमूद केले. 
 
दहशतवाद्यांचा अन्य देशांत पळ 

परकी दहशतवाद्यांनी आता इराक आणि सीरियाचे युद्धक्षेत्र सोडायला सुरवात केली असून, ते "इसीस'च्या अन्य देशांतील शाखांमध्ये भरती होऊ लागले आहेत. अन्य देशांमध्ये होऊ लागलेल्या हल्ल्यांना "इसीस'चे पाठबळ असून, ही मंडळी हॉटेल्स, टुरिस्ट रिसॉर्ट आणि सांस्कृतिक क्षेत्रांना लक्ष्य करताना दिसून येतात. भारताच्या दहशतवादविरोधी मोहिमेचे कौतुक करताना अमेरिकेने आज पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकमधील दहशतवादी संघटनांकडून सातत्याने भारतावर हल्ले केले जात असल्याचे दहशतवादविषयक अहवालात नमूद करण्यात आले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com