'कॅन्ससमध्ये असहिष्णुता आणि द्वेषाला स्थान नाही'

पीटीआय
गुरुवार, 9 मार्च 2017

श्रीनिवास कुचिभोतला आणि आलोक मदनासी यांच्यावरील भयंकर हिंसेच्या दुर्दैवी घटनेबद्दल मी दु:ख व्यक्‍त करतो. श्रीनिवासच्या पत्नी सुनयना आणि त्यांचे हैदराबादमधील कुटुंबियांना जे दु:ख झाले आहे, ते आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाहीत.

- सॅम ब्राऊनबॅक, गव्हर्नर कॅन्सस

वॉशिंग्टन - अमेरिकेतील कॅन्ससमध्ये भारतीय अभियंत्याची नुकतीच हत्या झाली. या पार्श्‍वभूमीवर कॅन्ससचे गव्हर्नर सॅम ब्राऊनबॅक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आमच्या राज्यात असहिष्णुता आणि द्वेषाला स्थान नसल्याचे स्पष्ट केले आहे.

'माझ्या देशातून निघून जा' असे म्हणत एका व्यक्तीने श्रीनिवास कुचिभोतला (वय 32) या अभियंत्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यामध्ये श्रीनिवासचा मृत्यू झाला होता. तर आलोक मदनासी नावाचा अन्य एक भारतीय तरुण जखमी झाला होता. हा प्रकार म्हणजे वैयक्तिक कृत्य असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले होते. श्रीनिवासची हत्या आणि अन्य काही घटनांमुळे अमेरिकेतील भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्‍वभूमीवर ब्राऊनबॅक यांनी मोदी यांना पत्र लिहिले आहे. ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हणत ब्राऊनबॅक यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

"श्रीनिवास कुचिभोतला आणि आलोक मदनासी यांच्यावरील भयंकर हिंसेच्या दुर्दैवी घटनेबद्दल मी दु:ख व्यक्‍त करतो. श्रीनिवासच्या पत्नी सुनयना आणि त्यांचे हैदराबादमधील कुटुंबियांना जे दु:ख झाले आहे, ते आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाहीत. श्रीनिवासचे धैर्य, प्रेम आणि सन्मानाची स्मृती कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. कॅन्ससमध्ये द्वेष आणि असहिष्णुतेसाठी कोणतेही स्थान नाही', असेही ब्राऊनबॅक यांनी पत्रात लिहिले आहे.

Web Title: Kansas Governer wrote to PM Modi